घरक्राईमनामाकाळाचौकीला गणेशोत्सव मंडपाजवळ विजेच्या धक्क्याने बालिकेसह दोघांचा मृत्यू

काळाचौकीला गणेशोत्सव मंडपाजवळ विजेच्या धक्क्याने बालिकेसह दोघांचा मृत्यू

चार जखमी

काळाचौकी येथील एका गणेशोत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या तात्पुरत्या स्टॉलमध्ये विजेचा प्रवाह (इलेक्ट्रिक करंट) उतरल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीचा समावेश असून एका १२ वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. ही दुर्घटना रविवारी (२० सप्टेंबर) पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील ‘महागणपती उत्सव मंडळ’ परिसरातील प्रवेशद्वाराजवळ भाविकांसाठी तात्पुरता पिण्याच्या पाण्याचा स्टॉल उभारण्यात आला होता. रविवारी पहाटे २.४२ वाजताच्या सुमारास या स्टॉलमध्ये अचानक वीजप्रवाह उतरला. यामुळे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना जोरदार विजेचा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दलाने (MFB) तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरातील वीजपुरवठा खंडित केला आणि खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर सील केला.

हे ही वाचा:

कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यूचा चुराडा; तिघे मृत्युमुखी

मयूरेश्वरा, तुझा महिमा कसा ?

लोखंडी गेट अंगावर कोसळून प्लंबरचा मृत्यू

‘चॅटजीपीटी’ प्रकरणातील IIT विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांत गुन्हा

या दुर्घटनेत एकूण ६ जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. जखमींपैकी पाच जणांना मसिना रुग्णालयात नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी रागिणी घनश्याम यादव (८ वर्षे) या बालिकेला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तर किरण अकबर नाईक (१९ वर्षे), तन्वी नरेश हांडे (१९ वर्षे) आणि साहिल संदीप तरे (१९ वर्षे) या तिघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे, ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सुजाता (३३ वर्षे) यांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तसेच रुही सिंग (१२ वर्षे) या बालिकेची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

‘बेस्ट’कडून घटनास्थळाची पाहणी

घटनेनंतर ‘बेस्ट’च्या अधिकाऱ्यांनी दत्ताराम लाड मार्गावरील दिग्विजय मिल चाळ परिसरातील वीज खांब क्रमांक DLM-14 येथे पाहणी केली. गणेशोत्सवातील रोषणाई आणि शीतपेयांच्या स्टॉलसाठी तात्पुरते मीटर (क्र. M217392) बसवण्यात आले होते. स्थानिक वायरमनने या तात्पुरत्या मीटरचे वायरिंग आणि एमसीबी आधीच डिस्कनेक्ट केले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून येथील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. काळाचौकी पोलिसांनी ‘बेस्ट’च्या मीटर निरीक्षकांना पुढील तपासणीसाठी पाचारण केले असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version