रुपयातील घसरण, शेअर बाजारातील महागडे मूल्यांकन आणि आर्थिक अनिश्चितता यांसारखी आव्हाने असूनही, अमेरिकेतील वॉल स्ट्रीट आता भारतातील पुढील मोठ्या गुंतवणूक संधीच्या शोधात आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, जागतिक वित्तीय क्षेत्रातील मोठ्या कंपन्या भारतातील आपली उपस्थिती वाढवत आहेत. मोठ्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री अर्थात आयपीओमध्ये सहभागी होण्याची संधी शोधत आहेत. तसेच, आगामी काळात भारतातील वाढता गुंतवणूकदार वर्ग देशाच्या वित्तीय बाजारपेठेला अधिक व्यापक बनवेल, असा त्यांचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी भारताचे आकर्षण केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आकारापुरते मर्यादित नाही. लाखो भारतीय पहिल्यांदाच वित्तीय बाजारपेठेत प्रवेश करत आहेत. त्याचवेळी, देशांतर्गत वापरातील वाढ आणि डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे भारताच्या वित्तीय क्षेत्राचे स्वरूप बदलत आहे. अल्पकालीन जोखमी असूनही, ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष जॉन ग्रे हे भारताबाबत आशावादी असलेल्या जागतिक वित्तीय क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींमध्ये आहेत. त्यांच्या मते, प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) भारत हा जगातील आकर्षक बाजारांपैकी एक आहे.
गेल्या दशकभरात ब्लॅकस्टोनने आपल्या खासगी इक्विटी आणि रिअल इस्टेट व्यवसायांच्या माध्यमातून भारतातील अनेक कंपन्यांना शेअर बाजारात सूचिबद्ध केले आहे. ग्रे यांनी भारतातील कंपन्यांच्या महसुलातील मजबूत वाढीचाही उल्लेख केला आहे. आगामी काही वर्षांत भारतातील ब्लॅकस्टोनच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेचे मूल्य दुप्पट होऊन १०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
काँग्रेस खासदार बिमोल अकोईजाम यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा
आरबीआयच्या कठोर उपाययोजनांनंतर रुपयाला आले बळ
कुठे आहे हुकुमशाही… ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना चहा, समोसे
२०० सरकारी अधिकारी संपर्कात, ज्ञानेश कुमारांकडून येतायत मेसेज
यापूर्वी खासगी इक्विटी गुंतवणूकदारांसाठी आपल्या गुंतवणुकीतून फायदेशीरपणे बाहेर पडण्याचे पर्याय तुलनेने मर्यादित होते. मात्र, आता भारताच्या बाजारपेठेत खासगी इक्विटी कंपन्या, खासगी कर्ज निधी आणि सार्वभौम संपत्ती निधी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भांडवल येत आहे. जागतिक व्यापार कंपन्या आणि हेज फंडही भारतातील आपली उपस्थिती वाढवत आहेत.
भारताबाबतच्या या वाढत्या उत्साहासोबत काही महत्त्वाच्या मर्यादाही आहेत. रुपयाचे अवमूल्यन झाल्यास परदेशी गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवरील परतावा डॉलरमध्ये रूपांतरित करताना नुकसान सहन करावे लागू शकते.
तरीही, जागतिक गुंतवणूकदार भारताकडे केवळ अल्पकालीन बाजारातील चढ-उतारांच्या दृष्टिकोनातून न पाहता, देशाच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या शक्यतांचा विचार करत आहेत. मिरा मनीचे सहसंस्थापक आनंद के. राठी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, भारतातील गुंतवणुकीचे आकर्षण देशाची विकासक्षमता, वाढता देशांतर्गत वापर आणि अधिक विकसित होत असलेल्या भांडवली बाजारपेठेवर आधारित आहे.
