हरियाणातील मोस्ट वॉन्टेड गुंड आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रीय सदस्य हॅरी बॉक्सर याला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, तो अमेरिकेत राहून भारतातील टोळीच्या कारवाया चालवत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. मुंबईतील चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारीही हॅरी बॉक्सरने स्वीकारली होती. त्याच्याविरोधात हत्या, धमकावणे आणि खंडणी उकळण्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.
हॅरी बॉक्सरने रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारानंतर सोशल मीडियावर पोस्ट आणि ऑडिओ संदेशाद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्याने बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना धमक्या दिल्या होत्या. अभिनेता रणवीर सिंह याच्याकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. या धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केले होते.
हॅरी बॉक्सरचे खरे नाव हरि चंद जाट आहे. तो राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील नारायणपूरचा रहिवासी असून, त्याने जयपूरमध्ये बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणूनही काम केले होते. बॉक्सिंगमुळेच त्याला ‘बॉक्सर’ हे नाव मिळाले. पुढे तो गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडला गेला. तो परदेशात राहून टोळीच्या कारवायांचे व्यवस्थापन करत असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. त्याच्याविरोधात राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि पंजाबमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, लूटमार, खंडणी आणि मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. कॅनडातील कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या ‘कॅप्स कॅफे’वर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करणारे ऑडिओ संदेशही सोशल मीडियावर प्रसारित झाले होते.
हे ही वाचा:
शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
निवडणुकांपूर्वी पाकिस्तानचे ‘आप’ प्रेम? भगवंत मान यांना व्हिसा देण्याची तयारी
१० लाखांचे बक्षीस असलेला झारखंडचा नक्षलवादी ठाकुर्लीतून अटकेत
व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी; ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्या हस्ते दीपप्रज्वलन
दरम्यान, हॅरी बॉक्सरला अमेरिकेत ताब्यात घेण्याच्या काही दिवस आधीच हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया या दोन फरार गुंडांनाही अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे परदेशातून भारतातील गुन्हेगारी कारवाया चालवणाऱ्या फरार गुंडांविरोधात भारतीय तपास यंत्रणांच्या प्रयत्नांना वेग आल्याचे मानले जात आहे.
