घरक्राईमनामामणिपूरमध्ये कुकी उग्रवाद्यांकडून सैन्याच्या चौकीवर गोळीबार; सुरक्षा कारवाई अधिक तीव्र

मणिपूरमध्ये कुकी उग्रवाद्यांकडून सैन्याच्या चौकीवर गोळीबार; सुरक्षा कारवाई अधिक तीव्र

उखरूल जिल्ह्यात अवैधरित्या उभारलेले सहा बंकर केले उध्वस्त

मणिपूरमध्ये गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यात संशयित सशस्त्र कुकी उग्रवाद्यांनी फौलजंग आणि गोथोल परिसरात भारतीय सैन्याच्या एका चौकीवर लक्ष्य साधत गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी उग्रवाद्यांविरुद्ध संयुक्त कारवाई अधिक तीव्र केली आहे.

इम्फाळ येथील एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, उग्रवाद्यांनी फौलजंग आणि गोथोल परिसरात गोळीबार केला आणि त्यांचे लक्ष्य फौगाकचाओ अवांग लैकाई येथील भारतीय सैन्याची चौकी होती. ते म्हणाले, “त्या भागात तैनात भारतीय सेना आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ, ५८वी बटालियन) यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. त्यामुळे बुधवारी उशिरा रात्री सुमारे ३० मिनिटे चकमक सुरू होती.”

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी पहाटेपासून भारतीय सेना, सीआरपीएफ, मणिपूर पोलिस आणि मणिपूर आर्म्ड फोर्स (इंडियन रिझर्व्ह बटालियन) यांनी गोळीबार झालेल्या भागात आणि आसपासच्या डोंगराळ परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. ते म्हणाले, “स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून सुरक्षा दलांकडून आसपासच्या डोंगराळ भागात कारवाई सुरूच राहील.” मणिपूर पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरवू नयेत आणि कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करावी, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका कारवाईत बुधवारी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी उखरूल जिल्ह्यातील लिटान आणि मोंगकट चेपू अपर गाव परिसरात अवैधरित्या उभारलेले सहा बंकर उध्वस्त केले. या कारवाईनंतर हिंसाचारग्रस्त लिटान भागातील बहुतांश बंकर निष्क्रिय करण्यात आले आहेत. परिसरात कोणताही हिंसाचार वाढू नये यासाठी सुरक्षा दल हाय अलर्टवर असून रणनीतीनुसार तैनाती करण्यात आली आहे.

सुरक्षा दलांनी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील पत्सोई परिसरातून युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (यूएनएलएफ)च्या एका सक्रिय सदस्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या उग्रवाद्याची ओळख असेम सुभाष मेईती उर्फ लिंगजेलखोम्बा (३०) अशी असून त्याच्याकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. याशिवाय, आणखी एका मोठ्या कारवाईत सुरक्षा दलांनी रविवारी (२२ मार्च) थोउबल जिल्ह्यातील हाओखोंग परिसरातून यूएनएलएफ (कोइरेंग गट)च्या १४ उग्रवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये दोन इन्सास रायफल, विविध शस्त्रांच्या १३ मॅगझिन, इन्सासच्या १०० गोळ्या, एक लाख रुपये रोख, १२ मोबाईल फोन, पाच हेल्मेट, पाच बॅकपॅक आणि चार वाहने यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

वडिलांना भेटू देत नसल्याने इम्रान खान यांच्या मुलाने ठोठावले यूएनएचआरसीचे दार

पर्यटन विभागापासून पोलिसांपर्यंत सर्वांना ‘धुरंधर’ची भुरळ; ‘हा’ डायलॉग प्रचंड ट्रेंडमध्ये

प. बंगालच्या बसीरहाटमधील मतदान यादीतून बीएलओसह ३४० मुस्लिम मतदारांना वगळले

भारताची एलपीजीची गरज भागवण्यासाठी दक्षिण अमेरिकन देशाकडून मदतीचा हात

केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दलांचे संयुक्त पथक संपूर्ण राज्यात उग्रवादी कारवायांविरोधात व्यापक मोहीम राबवत आहे. अनेक जिल्ह्यांतील संवेदनशील, मिश्र लोकसंख्या असलेल्या आणि सीमावर्ती भागांमध्ये शोधमोहीम आणि क्षेत्र नियंत्रण कारवाया सुरू आहेत. संपूर्ण मणिपूरमध्ये दरी आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ११३ तपासणी नाके उभारण्यात आले आहेत, ज्याद्वारे संशयित व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच, इम्फाळ-जिरीबाम राष्ट्रीय महामार्ग (एनएच-३७) वर अत्यावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या ट्रकांसह वाहनांना सुरक्षा एस्कॉर्ट देण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version