दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात विद्यार्थ्यांचे पेईंग गेस्ट (पीजी) वसतिगृह असलेली इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी इमारतीच्या मालकाला अटक केली आहे. हरिराम बन्सल असे आरोपीचे नाव असून, त्याला राजस्थानातील भिवाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
सत्य निकेतन परिसरातील ‘होस्टेल डेझ’ नावाची पाच मजली इमारत रविवारी (६ सप्टेंबर) अचानक कोसळली होती. ही इमारत विद्यार्थ्यांसाठी पीजी म्हणून वापरली जात होती. दुर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी इमारतीचा कथित मालक हरिराम आणि अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, इमारतीत दुरुस्ती आणि बांधकामाशी संबंधित काम सुरू होते. इमारतीच्या तळमजल्यात किंवा भुईतळ भागात सुरू असलेल्या कामामुळे संरचनेला धक्का बसल्याची शक्यता तपासली जात आहे. ही इमारत सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी असल्याचेही समोर आले आहे.
हे ही वाचा:
सहारनपूरमध्ये पाडलेल्या मशिदीखाली २० फूट खोल विहीर
डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याची चमक फिकी; चांदीही घसरली
समाजशास्त्र-मानववंशशास्त्र क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक शोभिता जैन यांचे निधन
एमपीएससी पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा
या दुर्घटनेनंतर इमारतीच्या सुरक्षिततेवर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दिल्ली महापालिकेने या प्रकरणात काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून, शहरातील बेकायदा उंच इमारतींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून, इमारतीचा मालक आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
