घरक्राईमनामानोकरी सोडा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा!

नोकरी सोडा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा!

७ हजार काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांना धमकी

- Advertisement -

जम्मू- काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या युनायटेड लिबरेशन कौन्सिलने (यूएलसी) काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची धमकी दिली असून, तसे न केल्यास जीवघेण्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. या धमकीमुळे सुमारे ७ हजार काश्मिरी पंडित कर्मचारी सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

खळबळजनक बाब म्हणजे, या कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, घराचे पत्ते आणि वाहन नोंदणी क्रमांक यांसारखी वैयक्तिक माहिती ऑनलाइन लीक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे काश्मिरी पंडित समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांना किमान पाच वेळा धमक्या देण्यात आल्या आहेत. १ सप्टेंबर रोजी यूएलसीकडून जारी करण्यात आलेल्या पत्रामध्ये काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यास सांगण्यात आले होते. काही वृत्तांनुसार, ही धमकीची पत्रे प्रथम डार्क वेबवर प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यानंतर व्हॉट्सअॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली.

काश्मिरी पंडित समुदायातील काही प्रतिनिधींनी या घटनेला गंभीर डेटा सुरक्षेचा प्रश्न म्हटले आहे. कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती दहशतवादी संघटनांपर्यंत कशी पोहोचली, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे याप्रकरणी तक्रार करण्यात आली असून, एफआयआर दाखल करून तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान पॅकेजअंतर्गत हजारो काश्मिरी पंडितांना जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. २००८ मध्ये सुरू झालेल्या पुनर्वसन योजनेनंतर २०१५ मध्ये आणखी सरकारी पदांना मंजुरी देण्यात आली होती. सध्या सुमारे ६ हजारांहून अधिक कर्मचारी खोऱ्यात कार्यरत असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यापैकी अनेक जण भाड्याच्या घरांमध्ये राहत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

हे ही वाचा:

इराणच्या पाच तेलवाहू जहाजांवर अमेरिकेचा हल्ला

उत्तर प्रदेशसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

रोहन पारीखला दिले होते पंतप्रधानांच्या खोट्या सहीचे ओळखपत्र

गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ

काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या ट्रान्झिट कॉलनींच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काही निवासस्थाने दुर्गम आणि असुरक्षित भागात असल्याचा आरोप असून, योग्य रस्ते, कुंपण आणि सुरक्षा व्यवस्था नसल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे ट्रान्झिट कॉलनी आणि भाड्याच्या घरांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करावे, धमकीमागील सूत्रधारांचा शोध घ्यावा आणि कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version