पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) उधळून लावला. या कारवाईत दोन पाकिस्तानी घुसखोर ठार झाले, तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे बीओपी राजोके परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या हद्दीतील चट्टनवाला भागातून किमान तीन जण भारतीय हद्दीकडे येत असल्याचे बीएसएफ जवानांच्या निदर्शनास आले. संशयास्पद हालचाली दिसताच जवानांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला. मात्र, इशारा देऊनही ते भारतीय हद्दीच्या दिशेने पुढे येत राहिल्याने बीएसएफ जवानांनी गोळीबार केला. या कारवाईत दोन घुसखोर ठार झाले, तर तिसरा व्यक्ती पाकिस्तानच्या दिशेने पळून गेला. ठार झालेल्या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांकडे सोपवण्यात आले असून, पंजाब पोलिसांच्या समन्वयाने पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
एमपीएससी सचिव महेंद्र हरपळकरांची बदली
“हल्ला झाला तेव्हा हनुमान चालीसा म्हणत होतो, हनुमानजींनीच वाचवले!”
“हिंदुस्तानी जीव घेणारे नाही, जीव वाचवणारे”
फ्लाय दुबईचा ‘तो’ हल्लेखोर वैमानिक जिहादी विचारसरणीचा
दरम्यान, पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या दोन नेटवर्कचा पर्दाफाश करत चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० किलो हेरॉईन आणि १० पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात आरोपींचे परदेशातील तस्करांशी संबंध असल्याचे समोर आल्याचे पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले. या प्रकरणी अमृतसरमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आले असून, नेटवर्कचे पुढील आणि मागील संबंध तपासले जात आहेत.
