घरसंपादकीयहिंदूराष्ट्र घोषित करण्याची आता गरजच नाही...

हिंदूराष्ट्र घोषित करण्याची आता गरजच नाही…

देशाचा आत्मा आता फक्त जागा झाला नसून तो पूर्ण तेजाने तळपतो आहे

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक यांच्या हस्ते पुण्यनगरी अयोद्धेत शिखर ध्वजारोहण सोहळा पार पडला. हिंदू अस्मितेचा पुन्हा एकदा जय जयकार झाला. हिंदुत्व, हिंदूंच्या परंपरा, श्रद्धा, हाच या देशाचा आत्मा आहे, याचा पुन्हा एकदा नि:शब्द जयघोष झाला. योगायोग म्हणजे यावर शिक्कामोर्तब करणारा एक महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. हा निर्णय लेफ्टनंट सॅम्युअल कमलेशन यांच्या कोर्टमार्शलवर भाष्य करणारा आहे. हा देश हिंदुराष्ट्रच आहे, ते सांगण्याची किंवा त्याची घोषणा करण्याची गरज नाही हे सिद्ध करणाऱ्या या दोन घटना आहेत.

देशाच्या घटनेत नसलेला सेक्युलरीझम हा शब्द आणीबाणीच्या काळात १९७६ साली घटनेत ४२ वी दुरुस्ती करून घुसडण्यात आला. घटनेच्या आत्म्याला नख लावण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेस आणि काँग्रेसच्या इको सिस्टीमने सेक्युलरीझमच्या नावाखाली देशावर हिंदू द्वेष लादण्याचा प्रयत्न केला. पुढे याच सेक्युलऱीझमचा वापर करून ज्या ज्या गोष्टींचा संबंध हिंदुत्व किंवा सनातन धर्माशी आहे, अशा प्रत्येक गोष्टीची यथेच्छ टवाळी करण्यात आली. हीच जमात आज सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरीयाशी करते आहे. हिंदूंच्या मनात आत्मग्लानी निर्माण व्हावी, हा या उपद्व्यापामागील उद्देश होता. त्यांच्या दुर्दैवाने देशाचा आत्मा आता फक्त जागा झाला नसून तो पूर्ण तेजाने तळपतो आहे. अयोध्येतील श्रीराम लला मंदिरावर फडकलेली भगवी शिखरध्वजा हा त्याचाच पुरावा आहे.

देशाच्या रक्तात जो बेगडी धर्मनिरपेक्षतावाद मिसळण्यात आला होता. त्याचे परिणाम कधी काळी न्यायपालिकेवरही झाले होते. अलिकडेच निवृत्त झालेले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी खजुराहो येथील मंदिरात भगवान विष्णूची मस्तक विहिन मूर्ति पूर्ववत करावी, अशी विनंती करणारी याचिका फेटाळताना ‘तुम्ही विष्णूचे कट्टर भक्त आहात, मग त्यांनाच प्रार्थना करा’ असे याचिकादाराची खिल्ली उडवणारे विधान केले होते. त्याच पदावर आलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुर्यकांत यांनी एक ऐतिहासिक निकाल दिलेला आहे.

हे ही वाचा:

दुबईस्थित ड्रग्ज तस्कर पवन ठाकूरला अटक; भारतात पाठवणार

“जर तुम्ही बंगालमध्ये मला लक्ष्य केले तर मी देशाला हादरवून टाकेन”

प्रभू श्रीराम मंदिराच्या कळसावर धर्मध्वज डौलात फडकला!

राम मंदिरावरील धर्मध्वजाबद्दल जाणून घ्या ‘या’ विशेष गोष्टी!

सॅम्युअल कमलेशन हे थर्ड कल्वरी रेजिमेंटमध्ये २०१७ मध्ये लेफ्टनंट म्हणून दाखल झाले. लष्करातील जवानांच्या धार्मिक श्रद्धा जपण्यासाठी प्रत्येक रेजिमेंटमध्ये काही धार्मिक कार्यक्रम केले जातात. दर आठवड्यात ठराविक दिवशी मंदिर, गुरुद्वाऱ्याच पूजाआर्चा, आरत्या केल्या जातात. रेजिमेंटमध्ये कोणत्या पंथाचे सैनिक आहेत, यावर तिथे मंदिर, गुरुद्वारा, बौद्ध विहाराची रचना केली जाते. ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांच्याशी आम्ही याबाबत चर्चा केली तर त्यांनी महत्वाची माहिती दिली. महाजन स्वत: मराठा रेजिमेंटमध्ये होते. ते म्हणाले की, दर रविवारी आमची मंदिर परेड असायची. आम्ही मंदिरात जाऊन आरती करायचो. मंदिरात श्रीगणेश, भवानी मातेच्या मूर्ति असायच्या. ही पद्धत सगळ्याच रेजिमेंटमध्ये असते. ख्रिस्ती किंवा मुस्लीम धर्मीयांची संख्या जर शंभरावर असेल तरच त्यांच्यासाठी चर्च किंवा मशिदीची व्यवस्था असते. अन्यथा सगळ्या धर्मातील लोक रेजिमेंटचे जे मंदिर किंवा गुरुद्वारा असतो, त्यात येऊन पूजा करतात.

महाजन यांच्या म्हणण्यानुसार एक गोष्टी स्पष्ट आहे की, लष्करातील सर्वधर्म समभावात हिंदू आस्थांची टवाळी होत नाही. अन्य धर्मीय जवानही हिंदू आस्थांचा आदर करतात. हेच नेमके सॅम्यूअल कमलेशन करत नव्हता. त्यांच्या वरिष्ठांनी याबाबत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा पवित्रा काही बदलला नाही. मी प्रोटेस्टंट ख्रिश्चन आहे, माझ्या धर्माला मूर्तिपूजा मान्य नाही. त्यामुळे मी मंदिरात जाऊन पूजा करण्यास नकार दिला. रेजिमेंटमध्ये फक्त मंदिर आणि गुरुद्वारा होते, चर्च नव्हते, असा युक्तिवाद करत त्याने मंदिराच्या गाभाऱ्यात जायला नकार दिला.

वारंवार सांगून सुद्धा सॅम्युएलच्या वागण्यात बदल न झाल्यामुळे ३१ जानेवारी २०१९ रोजी आर्मी एक्ट १९५० च्या सेक्शन १९ अंतर्गत सॅम्युअलला नोटीस बजावण्यात आली. ‘आपले वागणे आपल्या सहकार्य़ांशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यात मोठा अडसर आहे. युद्धाच्या परिस्थितीत हे अत्यंत हानीकारक ठरू शकते जिथे सौहार्दाच्या अभावाचा परीणाम तुमच्या यश-अपयशावर होऊ शकतो’, असे या नोटीसमध्ये म्हटले होते. सॅम्युअलचे कोर्ट मार्शल करण्यात आले. त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. ३० मार्च २०२५ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने लष्कराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ‘तुम्हाला धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु रेजिमेंटचा कमांडींग ऑफीसर म्हणून रेजिमेंटचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तुम्ही धर्मापेक्षा कर्तव्याला झुकते माप द्यायला हवे होते’, असे ताशेरेही सॅम्युअलवर ओढले. भारताचे वादग्रस्त माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे तिलक लावून घ्यायला नकार द्यायचे तसाच हा प्रकार.

उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरले.   ‘तुम्ही कशाप्रकारचा संदेश देऊ इच्छिता? ही वर्तणूक लष्कराच्या शिस्तीत बसत नाही, अशा अधिकाऱ्याला फेकून द्यायला हवे’, असे ताशेरे खंडपीठाने ओढलेले आहेत. ‘सैन्यदल ही धर्मनिरपेक्ष संस्था आहे, इथे शिस्तीशी तडजोड नाही’, या शब्दात खंडपीठाने आपले मत व्यक्त केले आहे. सॅम्युअलने सुद्धा न्यायालयात सर्वधर्म समभावाच्या बाता करत युक्तिवाद केला होता. ‘मी ख्रिस्ती आहे, परंतु माझ्यासाठी तिथे चर्च नव्हता. मी मूर्तिपूजा मानत नसल्यामुळे मी मंदिरात गेलो नाही’. हा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला नाही.

दोन गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट होतात. तुमच्या वैयक्ति श्रद्धा काहीही असल्या तरी तुम्ही बहुसंख्यकांच्या श्रद्धांचा सन्मान केला पाहिजे. त्या श्रद्धांकडे पाठ फिरवणे हाही त्यांच्या श्रद्धांचा अपमान आहे. त्यामुळेच मी फक्त मंदिराच्या गाभाऱ्यात येत नव्हतो, परंतु मंदिर परेडमध्ये सहभागी व्हायचो. मंदिरात न येण्यामुळे माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या संबंधात कुठेही खडा पडला नाही. हे सगळे युक्तिवाद टिकले नाहीत. तुम्ही जेव्हा समाजात वावरता, तेव्हा बहुसंख्यकांच्या श्रद्धा, प्रथा, परंपरा तुम्ही नाकारू शकत नाहीत. बहुसंख्यांच्या श्रद्धेपेक्षा माझ्या श्रद्धा वेगळ्या आहेत, त्यामुळे मी त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांकडे पाठ फिरवणार आणि वेगळ्या वाटेने जाणार हे चालणार नाही. हाच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे.

हा निकाल आधी लष्करी न्यायालयाने दिला. त्यावर देशाच्या उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच न्यायपालिकेने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जे काही म्हटले आहे, ती फक्त सॅम्युअलसारख्य़ा कोत्या मनाच्या अधिकाऱ्यांना दिलेली चपराक नाही. सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे देशातील त्या तमाम डाव्या आणि लिब्रांडूंचे थोबाड फोडले आहे, ज्यांच्या लेखी धर्मनिरपेक्षता म्हणजे कायमच हिंदू आस्थांच्या टवाळीचा विषय राहीलेला आहे.

पुरोगाम्यांनी हिंदुत्वाला बहुसंख्यवादाचे नाव देऊन त्याचा कायम उपमर्द करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक जगातील सगळ्यात प्रबळ लोकशाही म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष घेतात, त्या शपथेची अखेर ‘सो हेल्प मी गॉड’ या वाक्याने होते.

भारतात मात्र हिंदू हा शब्द उच्चारला तरी ज्यांना इंगळ्या डसू लागतात असे बरेच लोक आहेत. त्यांना या दोन्ही घटनांचा प्रचंड मानसिक त्रास होणार आहे. एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील शिखर ध्वज सोहळ्यात सहभागी झाले. हिंदुत्वाचा जयघोष केला. त्यांच्यासोबत विरोधक ज्या रा.स्व.संघाला संपवण्याची भाषा करतायत, त्या संघाचे सर्वोच्च नेते पूजनीय सरसंघचालक मोहनराव भागवत होते. दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातून स्पष्ट संकेत दिलेले आहे. तुमची वैयक्तिक श्रद्धा कोणतीही असू दे तुम्हाला बहुसंख्यकांच्या श्रद्धांचा, प्रथा, परंपरांचा यथोचित मान ठेवावा लागेल. तुम्ही वैयक्तिक आस्थांची ढाल करून बहुसंख्यकांच्या श्रद्धांकडे पाठ फिरवू शकत नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version