परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो, असे म्हणतात. दिशा सालियान प्रकरणात तसेच काहीतरी घडताना दिसते आहे. या प्रकरणाला अत्यंत धक्कादायक वळण लागले आहे. अत्यंत अनपेक्षित असे काहीतरी घडते आहे. मनसुख हिरेनच्या प्रकरणात अटकेत असलेला क्राईम ब्रांचचा अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. सचिन वाझेचे वर्णन ‘अ मॅन हू न्यू टू मच’ (A man who knew too much) असे करता येईल. वाझे माफीचा साक्षीदार बनायला तयार असेल, तर राजदत्त यांच्या ‘माफीचा साक्षीदार’ या सिनेमात माफीच्या साक्षीदारावर आलेली वेळ वाझेवर येणार नाही, याची काळजी आता राज्य सरकारने घ्यायला हवी.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुन्ह्यांची एक सलग मालिका घडत होती. घटना वरकरणी वेगवेगळ्या वाटत होत्या, परंतु त्यात एक समान सूत्र होते. काही पात्रेही समान होती. सगळ्या ठिकाणी असलेले एक समान खलनायकी पात्र म्हणजे—सचिन वाझे. हा असा एक गारदी होता, जो हुकमांची तामील करायचा. वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी होती. तो उलट्या काळजाचा होता. तो इसम म्हणजे सचिन वाझे. गुन्ह्यांच्या या मालिकेतील वाझे हा अत्यंत महत्त्वाचा आरोपी आहे. या गुन्ह्यांमध्ये नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत वाझेची भूमिका आहे. तो सध्या तळोजा तुरुंगात आहे. त्याने १३ खूनांच्या प्रकरणात माहिती देण्याची तयारी दाखवली आहे. अर्थात, तो माफीचा साक्षीदार बनायला तयार आहे. उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीखाली प्रचंड मोठा धमाका करणारी ही बातमी आहे. मातोश्रीचे संपूर्ण पितळ यामुळे उघड पडू शकते. उद्धव ठाकरे यांचा खेळ खल्लास होऊ शकतो.
वाझे हा बराच काळ तळोजा तुरुंगात अटकेत आहे. उसने सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांच्याकडे मेसेज पाठवला आहे. १३ खून प्रकरणात माहिती देण्याची त्याची इच्छा आहे. अर्थात त्याला डील करायची आहे, माफीचा साक्षीदार बनायचे आहे. त्याला फासातून स्वतःची मान सोडवून घ्यायची आहे. हे जर घडले, तर महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात धमाका होईल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेले राजकारणाचे गुन्हेगारीकरण जनतेसमोर येईल. याचा सगळ्यात मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे.
वाझेला बरेच काही ठाऊक आहे. हे त्याच्या राजकीय ‘गॉडफादर’नाही माहिती आहे. वाझेच्या जागी दुसरा कोणी असता, तर त्याला संपवण्यात आले असते. नाना पाटेकरचा ‘माफीचा साक्षीदार’ नावाचा सिनेमा आहे. पुण्यातील गाजलेल्या जक्कल-सुतार यांच्या खूनसत्रावर बेतलेल्या या सिनेमात माफीच्या साक्षीदाराची हत्या केली जाते. वाझे हुशार आहे; आपल्यावर ही वेळ येऊ शकते, हे त्याला ठाऊक होते. आपले जर काही बरे-वाईट करण्याचा प्रयत्न झाला, तर ज्याने तो केला तोही सुटणार नाही, याची खातरजमा उसने केलेली आहे.
हे ही वाचा:
सेमीफायनलआधी हरमनप्रीतचा टीम इंडियाला कानमंत्र
दिशा सालियन प्रकरणात सचिन वाझे होणार साक्षीदार?
शेफालीला पॅव्हेलियनचा इशारा फातिमाला महागात
आपल्या तमाम कारवायांचा तपशील असलेले एक पत्र त्याने त्याच्या विश्वासातील एका व्यक्तीकडे देऊन ठेवले आहे. ज्यामध्ये त्या कारवाया उसने कशा केल्या, या माहितीसह त्या कोणासाठी केल्या, याचाही तपशील आहे. हे असे कवच होते, ज्यामुळे वाझेला आजवर हात लागला नाही आणि भविष्यातही लागणार नाही. कारण त्याचे कारनामे इतके मोठे असूनही तो तुरुंगात सुरक्षित आहे. तुरुंगातील हाणामारीत मृत्यू झालेल्या कैद्यांची संख्या कमी नाही, पण वाझेकडे मात्र कवच आहे.
मनसुख हिरेनपासून दिशा सालियान आणि सुशांत सिंहपासून अनेक प्रकरणांत नेमके काय घडले, याचा तपशील पुराव्यासह जनतेसमोर येऊ शकतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाझे हा पोलिस आयुक्तांइतका महत्त्वाचा झाला होता. राज्याचा मुख्यमंत्री पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यासोबत बोलत नाही, असा काही नियम नाही; परंतु प्रथा मात्र तशीच आहे. वाझे हा त्याला अपवाद होता. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेही अपवादच होते. वाझेला ‘मातोश्री’वर थेट एंट्री होती. उद्धव ठाकरे थेट त्याच्याशी बोलायचे; कारण कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या अनेक गोष्टी करण्याची वाझेची तयारी असायची. अर्णब गोस्वामीची अटक हे वानगीदाखल सांगता येईल.
अँटालियाखाली स्फोटके ठेवण्याचा प्लॅन वाझेचा होता. परंतु, देशातील पहिल्या क्रमांकाच्या उद्योगपतीच्या आलिशान इमारतीखाली स्फोटकांची गाडी ठेवून त्याला दहशतवाद्यांची धमकी देण्याचा कट एखाद्या पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी करेल, यावर शेंबडे मूलही विश्वास ठेवणे शक्य नाही. वाझेचे काळीज मोठे आहे. अंबानींच्या महालाखाली स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवण्याचे धाडस त्याने केले. मनसुख हिरेन हा वाझेचा खबरी होता. अनेक वर्षे तो त्याच्यासोबत होता. हिरेनला बहुधा अँटालिया प्रकरणाची माहिती असावी. तो आपल्या गळ्यातला काटा बनू शकतो, असा फक्त संशय आल्यामुळे हिरेनचा काटा काढण्यात आला. वाझे इतका उलट्या काळजाचा आहे. अंबानींच्या प्रकरणात कोट्यवधींची खंडणी उकळायची होती, त्यात वाटेकरीही मोठे होते. ते कोण होते, याचा गौप्यस्फोट फक्त वाझे करू शकतो. दिशा सालियानचे प्रकरण चिल्लर वाटेल, अशा अनेक कहाण्या वाझेकडे आहेत. तो १३ खूनांची कबुली देणार आहे. याचा अर्थ दिशा आणि सुशांतसोबत अनेक नावे आहेत. असे लोक जे दिशा आणि सुशांतइतकेच कदाचित निष्पाप असतील; परंतु, त्यांच्या दुर्दैवाने त्यांना असे काही माहिती असेल किंवा त्यांनी पाहिले असेल, जे ऐकण्याची-पाहण्याची त्यांची इच्छाही नसेल. निव्वळ दुर्दैवी योगायोगामुळे ते या सापळ्यात अडकले आणि जीवाला मुकले.
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान या दोघांचे मृत्यू संशयास्पद होते. ८ जून २०२० रोजी जेव्हा दिशाचा मृत्यू झाला, त्या दिवशीही वाझे तिथे हजर होता. जर या प्रकरणात काही दडपादडपी झाली आहे, तर वाझेला त्याची इत्यंभूत माहिती आहे. तो त्या दडपादडपीचा साक्षीदार आहे आणि त्यात सहभागीही आहे. मनसुख हिरेनच्या प्रकरणात वाझे इतका गळ्यापर्यंत अडकला आहे की, तो जिवंत तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता कमी. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी त्याने हा सगळ्यात मोठा ‘गेम’ केला आहे.
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान या दोघांच्या संशयास्पद मृत्यूच्या पलीकडे वाझेला बरेच काही माहिती आहे; कारण तो ठाकरेंचा विश्वासू होता. तो फक्त पोलिस अधिकारी नव्हता, तर ठाकरेंच्या पक्षाचा पदाधिकारीही होता. ख्वाजा युनूसच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी त्याला बडतर्फ करण्यात आले होते. ठाकरेंचा त्याच्यावर इतका जीव होता की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे वारंवार फडणवीसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. २०१८ मध्ये वाझेचे निलंबन मागे घेण्यासाठी मला फोन केला होता, त्यांच्या विनंतीचा निरोप घेऊन शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले होते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०२१ मध्ये केला होता. अँटालिया प्रकरणात वाझेचा सहभाग उघड झाल्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
उद्धव ठाकरेंचे वाझेवर किती प्रेम होते आणि तो त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा होता, हे स्पष्ट करणारी ही घटना आहे. वाझेला अँटालिया प्रकरणी अटक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी वाझे आणि ठाकरे कनेक्शनचा हा गौप्यस्फोट केला होता. महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून फडणवीसांइतके प्रभावी काम कोणीच केले नसेल. आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून गुन्हेगारांच्या विरोधात तेच तांडव करण्याची संधी त्यांना नियतीने दिलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झालेला आहे. वाझेची बातमी रिपब्लिक चॅनेलने ब्रेक केली. कधीकाळी हाच चॅनेल ठाकरे आणि वाझेच्या दहशतीचा बळी ठरला होता. काळाचे चक्र आज उलटे फिरले आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
