देशातील राजकारण्यांबाबत लोकांच्या मनात कमी-जास्त राग-लोभ असू शकतो. परंतु स्पाय मास्टर, भारताचे जेम्स बाँड, देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबाबत देशातील जनतेच्या मनात भरभरून प्रेम आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंदूर येथे झालेल्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात त्यांच्यावरही शेलकी टीका केली. सत्तातुर राहुल गांधी आजवर त्यांचे नैराश्य भाजपा, संघ आणि मोदी सरकारवर काढत होते. आता त्यांनी डोवाल यांनाही रडारवर घेतले आहे. त्यांनी खरे तर ही चूक करू नये. ज्यांनी पाकिस्तानला पाणी पाजले, त्यांच्यासमोर राहुल गांधी यांची डाळ काय शिजणार? स्क्रिप्ट दिल्याशिवाय राहुल गांधी कोणत्याही विषयावर बोलत नाहीत. डोवाल यांच्याविरोधात बोलण्यासाठी स्क्रिप्टसोबत त्यांना सुपारीही मिळालेली दिसते.
अजित डोवाल हे आयपीएस अधिकारी आहेत. पाकिस्तानसारख्या शत्रू देशात त्यांनी ७ वर्षे हेरगिरी केली, यावरून देशासाठी जगण्या-मरण्याची त्यांची तयारी आहे हे स्पष्ट दिसते. आयबीमध्ये अनेक वर्षे सेवा करून निवृत्त झाल्यानंतर मोदी सरकारच्या कार्यकाळात त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी आली. त्याआधी ९ वर्षे त्यांच्याकडे कोणतीही सरकारी जबाबदारी नव्हती. डोवाल यांचे वय आज ८१ वर्षे आहे. वयाच्या खुणा त्यांच्या शरीरावर दिसू लागल्या आहेत. तरीही त्यांना निवृत्त करण्याची मोदींची इच्छा दिसत नाही. या वयातही ते जगभरात दौरे करत असतात. भारताची बाजू मांडत असतात. जगभरातील राष्ट्रप्रमुखही त्यांना आदराने भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात.
वयाची ८१ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करतात. यामागील तर्क असा आहे की, अशा व्यक्तीने आयुष्यात पौर्णिमेचे एक हजार पूर्ण चंद्र पाहिलेले असतात. डोवाल यांची बाब थोडी वेगळी आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात शत्रू देशांनी भारताला लावलेली हजारावर ग्रहणे पाहिली आहेत. देशावर आलेली अनेक संकटे परतवून लावली आहेत. त्यामुळे खरे तर देशातील तमाम जनतेने एकत्र येऊन त्यांचा सहस्त्रदर्शन सोहळा साजरा केला पाहिजे. परंतु दहशतवाद्यांसाठी रडणाऱ्या आईचा वारसा चालवणारे राहुल गांधी देशासाठी समर्पित असलेल्या लोकांना टार्गेट करतायत. कारण तुमची संवेदना एक तर देशात बॉम्बस्फोट आणि घातपात घडवणाऱ्यांसाठी असू शकते किंवा ते रोखणाऱ्यांसाठी. पाकिस्तान आणि काँग्रेससोबत करार करणाऱ्या चीनची हजारो षड्यंत्रे या माणसाने उलथवून लावली आहेत. हा माणूस भारताचा हमजा अली मजारीही आहे आणि अजय संन्याल सुद्धा आहे. राहुल गांधी यांची त्यांच्यासमोर उभे राहण्याची लायकी नाही. परंतु डान्सबारचे संस्कार असल्यामुळे हा माणूस तोंडाला येईल ते बोलत असतो. हा माणूस वर्तमानातला मीर जाफर, जयचंद आणि सूर्याजी पिसाळ आहे.
‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात नेहमीचे विखारी मनोरंजन करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. हा देशाचा विरोधी पक्षनेता आहे. देशात कितीही समर्थ आणि सक्षम सरकार असले तरी अनेक समस्या असतात. अशा गोष्टी असतात जिथे सरकार कमी पडत आहे. तिथे जनतेचे लक्ष वेधून सरकारला उघडे पाडणे हे विरोधी पक्षनेत्याचे काम आहे. हे करता आले तर त्याचा राजकीय लाभही त्यांच्या पदरात पडू शकतो. परंतु राहुल गांधी मात्र सतत मोदींना शिव्या घालत असतात. इंदूरच्या कार्यक्रमात त्यांनी मंचावर काही तरुणांना बोलवले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलतील अशी अपेक्षा करून त्यांना बोलवण्यात आले होते. त्यातला एक तरुण म्हणाला, ‘माझे शिक्षण सरकारी शाळेत झाले. या देशातील सामान्य माणूसही शिकू शकतो.’ एकाने सांगितले की, ‘सर्वसामान्य माणसाला शिकून नोकरी मिळू शकते.’ अनपेक्षित उत्तरे राहुल गांधींना या मंचावर ऐकायला लागली. त्यामुळे पुन्हा मोदींची मस्करी त्यांनी सुरू केली. एका सभेत मोदींनी एका वृद्ध स्त्रीला खुर्ची द्यायला सांगितली. राहुल गांधी यांच्यासोबत स्टेजवर असलेला स्टँड-अप कॉमेडियन पुलकीत मणी, दोघे याची मिमिक्री करत होते. मुळात राहुल गांधी स्टेजवर असताना दुसऱ्या स्टँड-अप कॉमेडियनची गरज नव्हती. राजकीय कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी बायका नाचवण्याची परंपरा उत्तर प्रदेशात सपाने रुजवली. काँग्रेस पक्षाला गर्दी जमवण्यासाठी कॉमेडियन लागतात. विचार कधीच संपला आहे, त्यामुळे उरलेला भंपकपणा लोकांना दाखवण्याचे काम राहुल गांधी करतायत. सोनिया गांधींचे हे संस्कार आहेत.
हे ही वाचा:
कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या १२ तास उशिराने
विखे पाटील घराण्याची लेक स्वीडनच्या संसदेत
द्वादशम तू गजानन, १२ नावांची कथा!
राहुल गांधी यांना डोवाल यांच्याबद्दल खुन्नस का आहे, हे समजून घेणे फार कठीण नाही. कधीकाळी पाकिस्तानच्या स्लीपर सेलची भारतातील सक्रियता, भारताच्या राजकारणावर असलेला त्यांचा प्रभाव मोडून काढण्यात डोवाल यांची मोठी भूमिका आहे. यातले बरेच काँग्रेसच्या हातात हात घालून काम करत होते. दहशतवाद्यांबाबत काँग्रेसच्या मनात असलेल्या ममत्वामुळे देशात नियमितपणे बॉम्बस्फोट व्हायचे, निर्दोष लोक मरायचे. काँग्रेसचे नेते कडक निंदा करून शांत व्हायचे. ‘अमन की आशा’च्या मेणबत्त्या जाळायचे. हे सगळे धंदे मोदींच्या सत्ताकाळात बंद झाले. आयएसआय समर्थित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेवर बंदी घालण्यात आली. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या त्यांच्या राजकीय शाखेने कर्नाटकात काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता. केरळमध्ये पाकिस्तानचा अजेंडा चालवणाऱ्या मुस्लिम लीगसोबत काँग्रेस पक्ष सत्तेत बसला आहे. हे काँग्रेसचे चारित्र्य आहे. त्यामुळे डोवाल यांच्याबद्दल त्यांच्या मनात ठासून भरलेला द्वेष असणे अत्यंत स्वाभाविक आहे.
इंदूरमध्ये राहुल गांधी यांनी डोवाल यांच्यावरील शाब्दिक हल्ल्याची सुरुवात करताना सांगितले, डोवाल इन्फॉर्मल गप्पांमध्ये बोलतात… मुळात ही सुरुवातच चुकीची आहे. अनेक वर्षे हेरगिरीच्या क्षेत्रात काढून जी व्यक्ती जिवंत आहे, ती अनौपचारिक गप्पांमध्येही अघळपघळ बोलेल याची शक्यता शून्य. डोवाल नशाही करत नाहीत. त्यामुळे ते बोलतात, बडबड करत नाहीत.
‘हिंदुस्तानला नियंत्रणात आणायचे असेल तर ५०० लोकांवर नियंत्रण ठेवा’, असे डोवाल म्हणाल्याचा राहुल गांधी यांचा दावा आहे. राहुल गांधी यांच्या आजीने देशातील ५०० नाही, हजारो महत्त्वाच्या लोकांना तुरुंगात टाकले. तरीही त्यांना देशावर नियंत्रण आणता आले नाही, हा या देशाचा इतिहास आहे. राहुल गांधी यांना ना देशाचा इतिहास माहीत, ना त्यांच्या पक्षाचा.
डोवाल यांचे टेलिफोन, व्हॉट्सॲप, फेसबुक अशा सर्व प्रकारच्या संवादावर नियंत्रण आहे. ते फोन टॅपिंगही करतात आणि माहिती मोदी-शहांना देतात. ‘माझ्या फोनमध्ये डोवाल आहे, तुमच्या फोनमध्ये डोवाल आहे’, असे राहुल गांधी यांचे भाषण आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात ते म्हणतात, अर्थमंत्रालयाच्या कार्यालयात हेरगिरीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे लावण्यात आली आहेत, असा मला संशय आहे. सल्लागार ओमिता पॉल, सचिव मनोज पंत आणि दोन कॉन्फरन्स रूममध्ये हे डिव्हाइस लावण्यात आलेले आहेत. मुखर्जी यांनी पंतप्रधानांकडे केलेल्या तक्रारीनंतर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली. तेव्हा मायक्रोफोन सापडले नाहीत, परंतु ते चिकटवण्यासाठी लावलेला चिकट पदार्थ मात्र सापडला होता.
कदाचित तपासणीच्या आधी साफसफाई करण्यात आली होती. हे घडले २०१० मध्ये, तेव्हा ना मोदींचे सरकार होते, ना अजित डोवाल सरकारमधील एखाद्या पदावर होते. जानेवारी २००५ मध्ये डोवाल डायरेक्टर इंटेलिजन्स ब्युरो या पदावरून निवृत्त झाले होते. यूपीएच्या काळात बगिंगचे आरोप मंत्र्यांनी केले. २०१० मध्ये प्रणव मुखर्जी आणि २०१२ मध्ये संरक्षण मंत्री ए. के. अँटनी. हेरगिरीच्या प्रकरणांचा बभ्रा विरोधकांनी केला नव्हता, तो केला होता काँग्रेसच्या वरिष्ठ मंत्र्यांनी. ही हेरगिरी कोणाच्या सांगण्यावरून होत होती? त्यावेळी सत्तेचे खरे सूत्रधार कोण होते? पंतप्रधानांपेक्षा अधिकारी जास्त कोणाला घाबरत होते? हे सर्वश्रुत आहे. खाई त्याला खवखवे अशी म्हण आहे. राहुल गांधी यांचे तसेच झाले आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
