घरदेश दुनियाकॅनडात खंडणी रॅकेटवर मोठा घाव; १६ भारतीयांना अटक

कॅनडात खंडणी रॅकेटवर मोठा घाव; १६ भारतीयांना अटक

५६ हून अधिक गुन्हे दाखल, गोळीबाराच्या १९ घटनांचाही तपास

कॅनडातील कॅलगरी शहरात दक्षिण आशियाई समाजाला लक्ष्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खंडणी रॅकेटविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत १६ भारतीय नागरिकांना अटक केली आहे. या सर्व आरोपींविरुद्ध एकूण ५६ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एकाही आरोपीकडे कॅनडाचे नागरिकत्व नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई ‘ऑपरेशन ओरायन’ आणि ‘ऑपरेशन आऊटेज’ अंतर्गत करण्यात आली असून, कॅलगरी पोलिसांनी आरोपींचे फोटोही सार्वजनिक करत नागरिकांकडून अधिक माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ पासून कॅलगरीमध्ये खंडणीशी संबंधित ४९ घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी १९ प्रकरणांमध्ये घरे, दुकाने किंवा वाहनांवर गोळीबार करण्यात आला होता. आरोपी व्यावसायिकांना फोन करून किंवा इतर माध्यमांतून मोठ्या रकमेची मागणी करत होते. पैसे न दिल्यास पीडितांसह त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणे हल्ले करण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या प्रकरणांमुळे कॅनडातील दक्षिण आशियाई समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हे ही वाचा:
विश्वविजेत्या भारताला आयर्लंडचे खुले आव्हान!

सेमीफायनलचे रणांगण तापले; भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे महाआव्हान!

कमर्शियल LPG पुरवठा पूर्ववत; उद्योगांना मोठा दिलासा

ऑस्ट्रेलिया नॉकआउट फेरीत!

कॅलगरी पोलिसांचे अधीक्षक जेफ बेल यांनी सांगितले की, या गुन्हेगारी साखळीचा तपास वेगाने सुरू असून नागरिकांच्या सहकार्यामुळे महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. आरोपी वेगवेगळ्या नावांनी समाजात वावरत असल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रे जाहीर करण्यात आली आहेत. पोलिसांनी या टोळीचे भारतस्थित बिश्नोई गँगशी संभाव्य संबंध आहेत का, याचाही तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप त्याबाबत ठोस पुरावे हाती आलेले नाहीत.

याप्रकरणी आणखी काही संशयितांचा शोध सुरू असून, त्यांच्याविषयी माहिती असलेल्या नागरिकांनी पोलिसांशी किंवा क्राईम स्टॉपर्सशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कॅनडातील दक्षिण आशियाई व्यावसायिकांना लक्ष्य करणाऱ्या संघटित गुन्हेगारीविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version