घरदेश दुनियापाकिस्तानात सिंधच्या विभाजनावरून संघर्ष; स्वतंत्र ‘सिंधुदेश’च्या घोषणा

पाकिस्तानात सिंधच्या विभाजनावरून संघर्ष; स्वतंत्र ‘सिंधुदेश’च्या घोषणा

कराचीमध्ये हजारोंचा मोर्चा

पाकिस्तानमधील सिंध प्रांताच्या विभाजनाच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी हजारो सिंधी राष्ट्रवादी नागरिकांनी कराचीमध्ये मोर्चा काढला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि पंजाबकेंद्रित सत्ताधारी यंत्रणा सिंधचे विभाजन करण्याचा कट रचत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी ‘सिंधुदेश’च्या स्वातंत्र्याच्या घोषणाही देण्यात आल्या. सिंधची विभागणी करण्याचा प्रयत्न झाल्यास पंजाबची आर्थिक नाकेबंदी करू, असा इशाराही राष्ट्रवादी संघटनांनी दिला.

‘जेय सिंध रहबर कमिटी’च्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात चार सिंधी राष्ट्रवादी पक्ष सहभागी झाले होते. आंदोलकांनी लाल झेंडे फडकावत आणि पारंपरिक सिंधी अज्रक व टोप्या परिधान करून सिंधच्या एकतेच्या घोषणा दिल्या. कराचीसह हैदराबाद, नवाबशाह आणि लरकाना या शहरांमध्येही विभाजनाच्या प्रस्तावाविरोधात निदर्शने झाली.

सिंधमधील शेतजमीन, किनारपट्टीवरील बेटे तसेच तेल, वायू आणि कोळशासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी संघटनांनी केला. ‘जेय सिंध मुत्तहिदा महाज’ या संघटनेने पंजाबच्या आर्थिक नाकेबंदीचा इशारा दिला. मात्र, हे संघटनांचे आरोप असून त्यांना स्वतंत्र दुजोरा मिळालेला नाही.

हे ही वाचा:

पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून सोनियांना कायदेशीर नोटीस

पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीरवर चिनी उपग्रहांची नजर?

मेरठमधून दहशतवादी कनेक्शन असलेल्या उजैदला अटक

हिजाबशिवाय गाणे म्हणणाऱ्या गायिकेला इराणमध्ये चाबकाचे फटके

नेमका वाद काय?

पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी देशात नवीन आणि लहान प्रशासकीय प्रांत निर्माण करण्याची कल्पना मांडली आहे. सध्या पाकिस्तानमध्ये चार प्रांत असून त्यांची संख्या १२ ते १५ पर्यंत वाढवण्याची चर्चा आहे. मात्र, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी सिंधच्या विभाजनाला विरोध केला आहे. दुसरीकडे, एमक्यूएम-पीने नव्या प्रांतांच्या निर्मितीला पाठिंबा दिला आहे. २९ नोव्हेंबरला कराचीमध्ये दोन्ही बाजूंच्या संघटनांकडून सभा आणि मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version