सौदी अरेबिया आणि येमेन आता मध्यपूर्वेतील युद्धाचे नवे केंद्र बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इस्लामचे पवित्र शहर असलेल्या मक्कावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा सौदी अरेबियाने केला आहे, तर हुथींनी हे नाकारले आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांशी लढणाऱ्या सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने बुधवारी सांगितले की, त्यांनी मक्काच्या दिशेने जाणारा एक ड्रोन पाडला आहे. मक्काच्या दक्षिणेकडे हा ड्रोन अडवण्यात आला. तो पवित्र शहराच्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले.
सौदीच्या नेतृत्वाखाली येमेनमधील हुथी बंडखोरांविरोधात कारवाई करणाऱ्या युतीचे प्रवक्ते तुर्की अल-मलिकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबरच्या संध्याकाळी सुमारे ६.५० वाजता सौदीच्या हवाई संरक्षण दलाने हा ड्रोन अडवला. ड्रोनचे अवशेष मक्केच्या दक्षिणेकडे पडल्याचेही सांगण्यात आले. या घटनेनंतर सौदीने मक्का आणि इस्लाममधील दोन पवित्र मशिदी तसेच यात्रेकरूंची सुरक्षा ही ‘रेड लाइन’ असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात अशा प्रकारच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
या घटनेनंतर मक्का, जेद्दाह आणि ताइफसह काही भागांत सुरक्षेचे इशारे जारी करण्यात आले. मक्कासाठी जारी करण्यात आलेला इशारा काही वेळातच मागे घेण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, मध्य-पूर्वेतील सध्याच्या संघर्षाच्या काळात मक्कासाठी जारी झालेला हा पहिलाच असा सुरक्षा इशारा होता. सौदीच्या युतीने हा हुथींचा मक्केला लक्ष्य करण्याचा दुसरा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी २०१७ मध्येही मक्केच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचा सौदीचा दावा होता. मात्र, हुथींच्या लष्करी सूत्रांनी मक्का किंवा अन्य इस्लामी पवित्र स्थळांना लक्ष्य केल्याचा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मक्काला कोणताही धोका निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश नाही.
हे ही वाचा:
उड्डाणानंतर विमानाला जोरदार हादरे, टायर निखळला; आपत्कालीन माघार
स्वयंपाकघराच्या अस्वच्छतेमुळे कॅफे मॉडेगरचा परवाना निलंबित
रशियाकडून तेल खरेदी केल्यास भारतावर १०० टक्के ‘टॅरिफ’
“भारताच्या परराष्ट्र धोरणाला इतर देशांच्या प्रमाणपत्राची गरज नाही”
दरम्यान, सौदी अरेबिया आणि हुथी यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे महत्त्व वाढले आहे. गेल्या काही दिवसांत सौदीच्या विविध भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाल्याचे अहवाल आहेत. सौदीच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमध्ये काही नागरिक जखमी झाले आहेत.
