अरबी समुद्रात समुद्री चाच्यांच्या तावडीत अडकलेल्या २० इराणी खलाशांची भारतीय नौदलाने सुखरूप सुटका केली आहे. भारतीय नौदलाने केलेल्या या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईचे इराणने कौतुक केले असून, भारत सरकार, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाचे विशेष आभार मानले आहेत. ३ नोव्हेंबर रोजी भारतातील इराणच्या दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत भारतीय सशस्त्र दलांच्या कामगिरीचे कौतुक केले.
इराणच्या दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अरबी समुद्रात समुद्री चाच्यांच्या ताब्यात असलेल्या अझिनी (Azini) या मासेमारी नौकेवरील २० इराणी खलाशांची यशस्वी सुटका केल्याबद्दल भारत सरकार, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाचे आम्ही मनापासून आभार मानतो.
भारतीय नौदलाच्या धाडसाचे कौतुक
इराणच्या दूतावासाने भारतीय सशस्त्र दलांच्या व्यावसायिक कौशल्याचे, धैर्याचे आणि प्रभावी समन्वयाचे विशेष कौतुक केले आहे. भारतीय सैन्यदलांनी दाखवलेली तत्परता ही मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणाच्या (HADR) क्षेत्रातील भारताची कटिबद्धता दर्शवते, असे इराणने म्हटले आहे.
हे ही वाचा:
रोहित-विराटची कीवी गोलंदाजांना डोकेदुखी!
मुईज्जूंच्या भारतविरोधी राजकारणाला विरोध करणारा मंत्री अटकेत
मंदिरांत पुजारी बलात्कार करतात…नेहा बोराने विष ओकले
छत्रपती संभाजीनगरमधून २,२७९ लिटर पतंजली तूप जप्त
भारताने आपल्या सीमांच्या पलीकडे जाऊन मानवी जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचेही इराणने नमूद केले. इराणच्या मते, भारतीय नौदलाची ही कारवाई दोन्ही देशांमधील मैत्री, एकता आणि सहकार्याच्या भावनेचे प्रतीक आहे. तसेच इराणी खलाशांची सुरक्षित सुटका सुनिश्चित करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्वांचे इराणने आभार मानले आहेत.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही केले होते नौदलाचे कौतुक
दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही भारतीय नौदलाच्या या मोहिमेचे कौतुक केले होते. अझिनी या समुद्री चाच्यांच्या ताब्यात असलेल्या मासेमारी नौकेवरील सर्व २० खलाशांची सुटका करण्यासाठी भारतीय नौदलाने ४८ तासांची अत्यंत नियोजनबद्ध मोहीम राबवली. मुंबईपासून अरबी समुद्रात तीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर ही कारवाई करण्यात आली.
राजनाथ सिंह यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते की, समुद्री चाच्यांकडून नौका आणि खलाशांची सुटका करण्यासाठी भारतीय नौदलाने अत्यंत वेगाने शोधमोहीम राबवली. त्यानंतर नौकेला अडवून सर्व खलाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली. या मोहिमेत भारतीय हवाई दलानेही वेळेवर मदत केली. मोठ्या प्रमाणात शस्त्रसज्ज असलेल्या समुद्री चाच्यांच्या विरोधात भारतीय नौदलाने दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता कौतुकास्पद आहे.
