इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आज एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इटलीच्या युद्धोत्तर त्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नेत्या ठरल्या आहेत. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इटलीच्या युद्धोत्तर इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहिल्याबद्दल माझ्या मैत्रीण पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे अभिनंदन. ही कामगिरी त्यांच्या नेतृत्वावर इटलीच्या जनतेचा असलेला विश्वास आणि भरोसा दर्शवते.” पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटले की, मेलोनी यांच्यासोबतच्या मैत्रीने भारत-इटली विशेष धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. “आपल्या दोन्ही देशांतील नागरिकांसाठी समृद्ध भविष्य घडवण्यासाठी आपले जवळचे सहकार्य पुढेही सुरू ठेवण्यास मी उत्सुक आहे. येत्या काळातील त्यांच्या सातत्यपूर्ण यशासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा,” असेही मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा:
टॅक्सी-रिक्षाच्या मीटरमध्ये ‘जुगाड’; बनावट भाडेवाढ करून प्रवाशांची लूट
‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! ७५ कोटींकडे झेप
सोनिया गांधींचे आत्मचरित्र हार्परकॉलिन्स इंडिया करणार प्रकाशित
फुकेट-दिल्ली एअर इंडियाच्या पायलटची ड्रग्ज चाचणी ‘नॉन-नेगेटिव्ह’
इटलीच्या राजकीय इतिहासात गेल्या ८० वर्षांत सुमारे ७० सरकारे सत्तेवर आली आहेत. अशा परिस्थितीत सलग ३ वर्षे, १० महिने आणि ११ दिवस पंतप्रधानपदावर राहून जॉर्जिया मेलोनी यांनी सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांच्या नावावर होता. एएफपीच्या वृत्तानुसार, बर्लुस्कोनी यांनी त्यांच्या चार कार्यकाळांपैकी एका कार्यकाळात सलग १,४१२ दिवस सरकारचे नेतृत्व केले होते. मात्र, आता जॉर्जिया मेलोनी यांनी हा विक्रम मोडीत काढत इटलीच्या युद्धोत्तर राजकीय इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
