अॅडोबच्या नेतृत्वात मोठा बदल होणार असून भारतीय वंशाचे अनिल चक्रवर्ती कंपनीचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ होणार आहेत. अॅडोबने त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली असून १ डिसेंबर २०२६पासून ते सीईओपदाची जबाबदारी स्वीकारतील. गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ कंपनीचे नेतृत्व करणारे शंतनू नारायण सीईओपदावरून पायउतार होणार आहेत. मात्र, ते अॅडोबच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदावर राहून कंपनीला मार्गदर्शन करणार आहेत.
अनिल चक्रवर्ती सध्या अॅडोबच्या कस्टमर एक्सपिरिअन्स ऑर्केस्ट्रेशन व्यवसायाचे अध्यक्ष आहेत. जानेवारी २०२०मध्ये ते अॅडोबमध्ये दाखल झाले. त्याआधी त्यांनी इन्फॉर्मेटिकाचे सीईओ म्हणून काम केले आहे. तसेच सिमॅनटेक, व्हेरिसाइन आणि मॅकिन्से यांसारख्या कंपन्यांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी आयआयटी वाराणसीमधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी पूर्ण केली.
हे ही वाचा:
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी सांगितलं, मोदी परदेशात का जातात?
आशियाई पदकांसाठी ‘अचूक निशाणा’
जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये एक दहशतवादी ठार
“ट्रम्प ज्यांना भेटू इच्छितात, त्या नेत्यांच्या यादीत मोदी सर्वात वर”
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल होत असताना चक्रवर्ती यांच्यासमोर अॅडोबला नव्या युगासाठी तयार करण्याचे आव्हान असेल. एआयवर आधारित उत्पादनांचा विस्तार, वाढती स्पर्धा आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा यावर त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. शंतनू नारायण यांनी चक्रवर्ती यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अॅडोब नव्या टप्प्यात प्रवेश करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
