घरदेश दुनियामदतीला ना पाकिस्तान, ना अमेरिका! हूतींच्या संकटात सौदी अरेबिया एकटा?

मदतीला ना पाकिस्तान, ना अमेरिका! हूतींच्या संकटात सौदी अरेबिया एकटा?

मित्र देशांच्या भूमिकेमुळे सौदीची कोंडी

येमेनमधील इराणसमर्थित हूती बंडखोर आणि सौदी अरेबियामधील संघर्ष शिगेला पोहचलेला असताना सौदी अरेबियाला मात्र अद्याप अपेक्षित लष्करी मदत मिळताना दिसत नाही. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील नव्या संरक्षण करारामुळे पाकिस्तान सौदीच्या मदतीला लष्करीदृष्ट्या धावून येईल, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, पाकिस्तानने सध्या कोणत्याही लष्करी कारवाईचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे हूतींविरोधात हवाई हल्ले करण्याची मागणी केल्याचा दावा समोर आला आहे. मात्र, ट्रम्प यांनीही थेट लष्करी कारवाई करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिका दोघांनीही पाठ दाखवल्यामुळे सौदी अरेबिया चांगलाच कोंडीत सापडल्याचे बोलले जात आहे.

येमेनमधील संघर्षाची तीव्रता अलीकडच्या काळात वाढली आहे. इराणसमर्थित हूती बंडखोरांनी लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील मोखा हे महत्त्वाचे बंदर ताब्यात घेतले आहे. या भागाचे सामरिक महत्त्व मोठे असून, बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीजवळील हालचालींमुळे लाल समुद्रातील जहाज वाहतुकीबाबत चिंता वाढली आहे. हूतींच्या या वाढत्या प्रभावामुळे सौदी अरेबियासमोरील सुरक्षेचे आव्हानही गंभीर झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे. पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की यांच्यात नुकत्याच झालेल्या संरक्षण करारानुसार एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा सर्वांवरील हल्ला मानला जाणार असल्याचे ठरले आहे. त्यामुळे सौदी अरेबियावर हूतींचे हल्ले वाढल्यास पाकिस्तानला या कराराअंतर्गत भूमिका घ्यावी लागेल का, असा प्रश्न उपस्थित झाला. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी याआधी हूतींचे हल्ले वाढल्यास हा करार सक्रिय होऊ शकतो, असे म्हटले होते.

मात्र, त्यानंतर पाकिस्तानने आपली भूमिका नरम केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सौदीवरील हूतींच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सध्या कोणतीही लष्करी कारवाई चर्चेत नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानने संघर्ष वाढवण्याऐवजी संयम, संवाद आणि राजनैतिक मार्गावर भर देण्याची भूमिका घेतली आहे. याच काळात सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दोन वेळा फोनवर चर्चा करून हूतींविरोधात तातडीने हवाई हल्ले करण्याची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. हूतींच्या वाढत्या कारवायांमुळे लाल समुद्रातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गाला तसेच सौदीच्या तेल निर्यातीला धोका निर्माण होत असल्याने सौदी नेतृत्वाने अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केल्याचे वृत्त आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने थेट लष्करी हस्तक्षेप करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशला हरवून भारत आशिया कपच्या फायनलमध्ये!

साखरेचे दर भडकू नयेत म्हणून सरकार अलर्ट

स्थानिक चलनात व्यापाराला प्राधान्य

भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर गोलवर्षाव!

या घडामोडींमुळे पाकिस्तानची कोंडीही वाढली आहे. एकीकडे सौदी अरेबियासोबत पाकिस्तानचे संरक्षण आणि आर्थिक संबंध आहेत, तर दुसरीकडे इराणशीही पाकिस्तानला संबंध कायम ठेवावे लागतात. त्यामुळे सौदीच्या बाजूने थेट लष्करी संघर्षात उतरल्यास पाकिस्तानच्या इराणसोबतच्या संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे पाकिस्तान सध्या मध्यस्थाची भूमिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version