अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र होत असताना यापूर्वी त्यांच्यात मध्यस्थाची भूमिका पार पाडणाऱ्या पाकिस्तानसमोर मात्र मोठी राजनैतिक कोंडी निर्माण झाली आहे. इराण आणि आखाती देश या दोन्ही बाजूंशी जवळचे संबंध असल्याने पाकिस्तानला अत्यंत सावध भूमिका घ्यावी लागत आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी सध्याची परिस्थिती म्हणजे ‘तारेवरची कसरत’ असल्याचे मान्य केले आहे.
पाकिस्तानचे इराणसोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत, तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि संघर्षात सहभागी असलेल्या इतर आखाती देशांशीही पाकिस्तानचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही एका बाजूने ठामपणे उभे राहणे पाकिस्तानसाठी अडचणीचे ठरू शकते. जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, पाकिस्तानने अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांशी संपर्क कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही बाजूंशी संवाद साधणे आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल, अशी कोणतीही पावले टाळणे, हीच सध्या इस्लामाबादची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आसिफ यांच्या मते, संघर्षातील आखाती देशांशी पाकिस्तानचे संबंध जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच इराणसोबतचे संबंधही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पाकिस्तानला आपली ‘डिप्लोमॅटिक स्पेस’ म्हणजेच राजनैतिक वाव शक्य तितका टिकवून ठेवायचा आहे. कोणत्याही एका बाजूने उघडपणे भूमिका घेतल्यास दुसऱ्या बाजूशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
हे ही वाचा:
ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘लाडकी बहीण’ योजनेचीही चर्चा
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दर्ग्यावर कारवाई कधी?
क्रिप्टोवर सरकारचा ‘कडक’ पहारा
विधानसभेतील गदारोळानंतर बीआरएसचे २२ आमदार निलंबित
दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे आखाती प्रदेशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिका आणि इराणकडून जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबतही चिंता वाढली आहे. या संघर्षाचा परिणाम म्हणून ब्रेंट कच्च्या तेलाचा भाव १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे.
