महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लंडन दौरा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांना ब्रिटिश संसदेत आयोजित दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तीन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’, तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ प्रदान केला जाणार आहे. याशिवाय लंडनमधील महाराष्ट्र मंडळाकडून त्यांना ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारानेही गौरविण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यासाठी बुधवारी रवाना झाले. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राबवलेल्या नागरिककेंद्रित, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनासाठी त्यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ प्रदान करण्यात येणार आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, नागरिकांपर्यंत सरकारी सेवांची थेट पोहोच आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख या पुरस्कारासाठी करण्यात आला आहे. यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, १० सप्टेंबर रोजी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६ : ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’ आयोजित करण्यात आला आहे. इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार असून, एकनाथ शिंदे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. यावेळी त्यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या परिषदेत शिंदे महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन तसेच भारत-ब्रिटन आर्थिक संबंधांमध्ये महाराष्ट्राची भूमिका याबाबत आपले विचार मांडणार आहेत. शहरी विकास, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील महाराष्ट्राच्या प्रगतीवरही विशेष भर दिला जाणार आहे.
हे ही वाचा:
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दर्ग्यावर कारवाई कधी?
क्रिप्टोवर सरकारचा ‘कडक’ पहारा
विधानसभेतील गदारोळानंतर बीआरएसचे २२ आमदार निलंबित
ग्रामीण रोजगाराच्या मागणीत मोठी वाढ
एकनाथ शिंदे लंडनमधील ९४ वर्षे जुन्या महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र भवनालाही भेट देणार आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील योगदान तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यांसारख्या उपक्रमांसाठी महाराष्ट्र मंडळाकडून त्यांना ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिंदे यांच्या लंडन दौऱ्यादरम्यान ‘कॅनव्हास फॉर केअर’ या संसदीय कला प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी ब्रिटनमधील मुलांनी महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या योजनांच्या संकल्पनेवर आधारित चित्रे तयार केली आहेत.
