पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहचला असून पाकीस्तानने अफगाणिस्तानवर ड्रोन हल्ले केले आहेत. अफगाणिस्तानातून पाकिस्तानच्या हद्दीत ड्रोन घुसल्याचा दावा करत पाकिस्तानने १० ठिकाणांवर हवाई आणि ड्रोन हल्ले केल्याचे म्हटले आहे. ही ठिकाणे ड्रोनच्या प्रक्षेपणासाठी आणि साठवणुकीसाठी वापरली जात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्लाह तारार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या कारवाईची माहिती दिली. पाकिस्तानच्या सार्वभौम सुरक्षेच्या अधिकाराचा वापर करत ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने बुधवारी अफगाणिस्तानातून आलेले ड्रोन शोधून त्यांना लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच निष्प्रभ केले होते, असा दावाही त्यांनी केला. तारार यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर पाकिस्तानने ड्रोनच्या प्रक्षेपण आणि साठवणुकीशी संबंधित १० ठिकाणांवर अचूक हवाई आणि ड्रोन हल्ले केले. ही कारवाई केवळ संबंधित लष्करी ठिकाणांपुरती मर्यादित होती आणि ती नियोजित व प्रमाणबद्ध असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
या कारवाईच्या एक दिवस आधी अफगाणिस्तानातून पाकिस्तानच्या हवाई हद्दीत आठ ड्रोन दाखल झाल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनी केला होता. त्यापैकी चार ड्रोन तोर्खम सीमेजवळ, तर अन्य चार ड्रोन कोहाट परिसरात पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानने या ड्रोन घुसखोरीला आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आणि आक्रमक कारवाई म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘धुरंधर’ने बदलला लडाखच्या पर्यटनाचा चेहरा
जगातील संघर्ष सोडवण्यात आंतरराष्ट्रीय व्यवस्था अपयशी
ग्रेटर नोएडात धावत्या स्लीपर बसला आग लागून नऊ जणांचा मृत्यू
स्वदेशी एसीव्ही एच-५६२ तटरक्षक दलाच्या ताफ्यात
पाकिस्तानच्या या हल्ल्यांपूर्वी २१ सप्टेंबरला पाकिस्तानी लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानातील कुनार आणि पक्तिका प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानने या कारवाईत २८ दहशतवादी मारल्याचा दावा केला होता. मात्र, अफगाणिस्तानने या हल्ल्यांमध्ये तीन नागरिकांचा मृत्यू आणि चार जण जखमी झाल्याचे सांगितले होते. संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानातील मिशननेही तीन नागरिकांच्या मृत्यूची पुष्टी केली होती.
