घरविशेषग्रेटर नोएडात धावत्या स्लीपर बसला आग लागून नऊ जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडात धावत्या स्लीपर बसला आग लागून नऊ जणांचा मृत्यू

चालकाने प्रवाशांच्या इशाऱ्याकडे केले होते दुर्लक्ष

- Advertisement -

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग लागून नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास हा अपघात झाला. बस दिल्लीहून महोबा येथे जात होती. बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी असल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, बस यमुना एक्सप्रेसवेवरील किलोमीटर क्रमांक ३३ जवळ पोहोचली असताना काही प्रवाशांना चालकाच्या केबिनजवळून जळल्याचा वास येत असल्याचे जाणवले. प्रवाशांनी चालक आणि वाहकाला याबाबत सांगितले. मात्र, एफआयआरमध्ये करण्यात आलेल्या आरोपानुसार, चालकाने परिस्थिती तपासण्यासाठी बस तात्काळ थांबवली नाही आणि चालक आणि वाहक केबिनमध्ये बिडी/सिगारेट ओढत राहिले. त्यानंतर काही वेळातच चालकाच्या सीटजवळ अचानक आगीच्या ज्वाळा भडकल्या.

आग वेगाने संपूर्ण बसमध्ये पसरली. बसमध्ये धूर भरल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या बसमधून उड्या मारल्याची माहिती आहे. काही प्रवाशांनी बस थांबवण्याची विनंती केली, मात्र एफआयआरनुसार चालक आणि वाहकाने सुरुवातीला बस थांबवली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी सुरू आहे.

एका प्रवाशाने सांगितले की, तो बसमध्ये झोपलेला असताना कोणीतरी त्याला उठवून बसला आग लागल्याचे सांगितले. बसमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता आणि बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागाही नव्हती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आणखी एका प्रवाशाने सांगितले की, तिने आपले सामान किंवा चपलाही घेतल्या नाहीत; केवळ मोबाइल घेऊन ती बसमधून बाहेर पडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसचा मोठा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून प्रवाशांची चौकशी करून घटनेचा तपास केला जात आहे.

हे ही वाचा:

स्वदेशी एसीव्ही एच-५६२ तटरक्षक दलाच्या ताफ्यात

हमासचा अर्थविभाग प्रमुख मोहम्मद अबू अलवानला इस्रायलने टिपले

भाजपची नवी मोर्चेबांधणी; महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी

दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करणार

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना योग्य उपचार मिळावेत आणि पीडित कुटुंबीयांना आवश्यक ती मदत मिळावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version