भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध जगजाहीर असताना आता रशियाने पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासंदर्भात भाष्य केले आहे. भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी रशिया आवश्यक तेवढ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी स्पष्ट केले आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यास अमेरिकेकडून १०० टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अलीपोव्ह यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या धोरणावर जोरदार टीका केली. त्यांनी या कारवाईला भारतावर दबाव आणण्याचे तंत्र असल्याचे म्हटले आहे.
रशियाकडून तेल खरेदी करणे हा भारताचा स्वतःचा निर्णय असून, भारत ही खरेदी रशियाला मदत करण्यासाठी नव्हे तर आपल्या १४० कोटी नागरिकांच्या विकासासाठी आणि ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी करत असल्याचे अलीपोव्ह यांनी सांगितले. भारताला आपल्या राष्ट्रीय हितानुसार ऊर्जा स्रोत निवडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रशियन राजदूतांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मॉस्को भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. भारताला जितक्या प्रमाणात तेलाची आवश्यकता असेल, तितका पुरवठा करण्याची रशियाची क्षमता आणि तयारी आहे. पाश्चिमात्य देशांकडून लादण्यात येणारे निर्बंध आणि शुल्क हे मुक्त व्यापाराच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याची टीकाही त्यांनी केली.
हे ही वाचा:
अमेरिकेत अमेझॉनच्या कार्गो विमानाचा अपघात; ५ जणांचा मृत्यू
नेपाळमधील जलप्रलयानंतर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला दणका
दिल्लीत ढिगाऱ्यात अडकलेल्या विद्यार्थ्याचा आपत्कालीन मदतीसाठीचा व्हिडिओ व्हायरल
इशान किशनच्या शतकामुळे पूर्व विभाग मजबूत स्थितीत
रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर आर्थिक कारवाई करण्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे. अशा देशांच्या उत्पादनांवर तब्बल १०० टक्के शुल्क लावण्याची शक्यता व्यक्त होत असताना भारत-रशिया तेल व्यापार पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रशियन तेलाची खरेदी थांबवल्याने रशिया-युक्रेन युद्ध संपणार नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच म्हटले होते. युद्धाचा तोडगा केवळ संवाद आणि राजनैतिक मार्गानेच निघू शकतो, अशी भारताची भूमिका आहे.
