काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाआधी पुण्यात वाद झाल्याचे समोर आले आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृह परिसरात काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) आणि भाजपची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) चे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तुफान वाद आणि हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
या वादाची सुरुवात राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी आणि दोन विद्यार्थिनींच्या सहभागावरून झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही विद्यार्थी संघटनांकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेस आणि NSUIच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर तसेच राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली होती. त्यानंतर ABVP कार्यकर्त्यांनी या विद्यार्थिनींना धमकावल्याचा आणि त्यांना वसतिगृहात डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
दुसरीकडे ABVPने काँग्रेस आणि NSUIचे आरोप फेटाळले आहेत. काँग्रेस-NSUIचे कार्यकर्ते वसतिगृह परिसरात घुसले आणि विद्यार्थिनींवर राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नोंदणी करण्याचा दबाव टाकला, असा आरोप ABVPकडून करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
“होर्मुझ आता अमेरिकेचा प्रदेश” ट्रम्प यांचा पुनरुच्चार
कॅनडातील गुरुद्वारात चाकूहल्ला; २७ वर्षीय आरोपी अटकेत
मॅकडोनाल्ड्ससह १३ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित
…म्हणून ‘सीजेपी आंदोलन हा एक अर्बन नक्षलवाद!’
शुक्रवारी रात्री वसतिगृहाबाहेर दोन्ही गटांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने जमा झाले. घोषणाबाजी आणि रस्त्यावर गर्दी झाल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर COEP परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. राहुल गांधींचा कार्यक्रम आज पुण्यात होणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
