देशात अराजकता माजविण्याचा जे प्रयत्न करत आहेत, त्यांचे ते षडयंत्र कदापि यशस्वी होऊ देणार नाही. जनतेला विकसित भारत हवा आहे, त्यांना अराजकता नको आहे. अराजकता आम्ही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत खासदार पियूष गोयल यांनी विरोधकांकडून देशभरात अराजकतेच्या माध्यमातून सत्तापालट करण्याच्या प्रयत्नांचा समाचार घेतला. शनिवारी बोरिवलीतून भाजपाने देशात अराजकता माजविण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांविरोधात भव्य पदयात्रेचे आयोजन केले होते. लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ असा नारा देत या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पदयात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी अराजकतेला जबरदस्त विरोध केला.
या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. विरोधकांकडून गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या अराजकतावादी आंदोलनांना उत्तर देण्यासाठी सध्या भाजपाने देशभर एल्गार पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बोरिवली स्टेशनपासून ही पदयात्रा सुरू झाली होती. त्यात खासदार पियूष गोयल यांच्यासोबत आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार संजय उपाध्याय सहभागी झाले होते.
हे ही वाचा:
ऍड. संजीव पुनाळेकर यांना मातृशोक
हवाई दलाचे प्रमुख आशुतोष दीक्षित यांनी स्वीकारली सूत्रे
‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मण यांचा आज वाढदिवस
यास्तिका भाटियाचे ब्रिस्बेन हीटकडून पदार्पण
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही राहुल गांधींच्या आंदोलनावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राहुल गांधींचे आंदोलन ही एक नौटंकी आहे. उत्तर मुंबईने हे उत्तर दिलं आहे. देश आता राहुल गांधींना उत्तर देईल आणि जनतेने त्यांना नाकारले आहे. यापुढेही ती नाकारत राहील. या देशात जे अराजकता आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे प्रयत्न जनता यशस्वी होऊ देणार नाही.
पीयूष गोयल यांनी एका संदेशाद्वारे भारताच्या विकासाचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून संरक्षण, अंतराळ, अणुऊर्जा, हरित ऊर्जा, उत्पादन आणि नवोन्मेष अशा विविध क्षेत्रांत देश वेगाने प्रगती करत आहे. मात्र, काही लोकांना देशाची ही प्रगती पाहवत नसून ते प्रत्येक गोष्टीला विरोध करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांसारख्या घटनात्मक संस्थांचा अपमान केला जात असल्याचेही ते म्हणाले.
या पदयात्रेत सहभागी होऊन देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहन पीयूष गोयल यांनी केले होते.
शिवाजी पार्कपासून पदयात्रा
दरम्यान, येत्या २ नोव्हेंबरला दुपारी ३.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते कामगार कल्याण मंडळ मैदान अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. भाजपा मुंबई महामंत्री राजेश शिरवडकर यांनी आवाहन केले आहे की, या भव्य पदयात्रेमध्ये संम्मिलीत होऊन देश विरोधी काम करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देऊया.
