हॉकी विश्वचषक २०२६ मधून भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघांना दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. पुरुष संघाला दुसऱ्या फेरीत नेदरलँड्स आणि अर्जेंटिनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेबाहेर जावे लागले. त्यामुळे भारतीय पुरुष संघाचा १९७५ पासून विश्वचषकात पदक जिंकण्याचा दुष्काळ आणखी लांबला आहे.
भारतीय संघांच्या या निराशाजनक कामगिरीनंतर माजी गोलरक्षक आणि ऑलिम्पिक पदकविजेत्या संघाचा सदस्य पीआर श्रीजेश यांनी सोशल मीडियावरून भारतीय हॉकीतील जबाबदारीच्या अभावावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
श्रीजेश यांनी ‘एक्स’वर लिहिले, “काळजी करू नका, विश्वचषकामुळे काही फरक पडत नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा येत आहेत. तिथे पदक जिंका आणि मग लॉस एंजेलिस २०२८ चे स्वप्न पाहायला सुरुवात करा. विश्वचषकात जे काही चुकले ते झाकण्यासाठी हे पुरेसे आहे, असे दिसते.”
महिला संघाच्या तयारीवरही श्रीजेश यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. “विश्वचषकाच्या अगदी आधी महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक सुट्टीवर होते. तरीही मुलींनी पूर्ण ताकदीने लढा दिला आणि अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. त्याचे श्रेय खेळाडूंना जाते. पण जबाबदारी कुठे आहे? तयारीच्या अंतिम टप्प्यात मुख्य प्रशिक्षक संघासोबत नसताना आपण खरोखरच संघाकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा करतो का?” असा सवाल त्यांनी केला.
पुरुष संघाच्या कामगिरीवर भाष्य करताना श्रीजेश म्हणाले की, “एक बलाढ्य संघाकडून पराभव झाला, तर तो शिकण्याचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. एका आशियाई संघाला हरवले की शानदार विजय म्हटले जाते. चांगली हॉकी खेळली की चांगली कामगिरी म्हटली जाते. पण कठीण प्रश्न असा आहे की, आपण फक्त चांगली हॉकी खेळण्यासाठी संघ तयार करत आहोत की जगातील सर्वोत्तम संघांना पराभूत करण्याची क्षमता असलेला संघ?”
“शिकण्याचा अनुभव, चांगली हॉकी आणि आगामी स्पर्धांच्या नावाखाली अपयश झाकणे थांबवा. विश्वचषक ही रंगीत तालीम नाही. हा विश्वचषक आहे,” असे श्रीजेश यांनी स्पष्टपणे सुनावले.
शेवटी त्यांनी भारतीय हॉकीच्या व्यवस्थापनालाच थेट सवाल केला. “कठीण प्रश्न कोण विचारणार? जबाबदारी कोण मागणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खरंच कोणाला याची काळजी आहे का?” असा सवाल श्रीजेश यांनी उपस्थित केला.
श्रीजेश यांच्या या रोखठोक वक्तव्यामुळे भारतीय हॉकीच्या कामगिरीसोबतच संघाच्या तयारीपासून व्यवस्थापनापर्यंतच्या अनेक बाबींवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
