न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील आव्हानात्मक परिस्थितीचा आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाला चांगला फायदा होणार आहे. दोन वनडे सामन्यांमध्ये खेळपट्टीवर मिळालेला स्विंग, सीम मूव्हमेंट आणि अनपेक्षित उसळी यामुळे न्यूझीलंडमधील वातावरणाचा अंदाज खेळाडूंना आला आहे. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताची तयारी चांगली झाली असल्याचा विश्वास भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी व्यक्त केला.
हॅमिल्टन येथे मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना कोटक यांनी कसोटी मालिकेच्या तयारीबाबत सविस्तर भूमिका मांडली. पहिल्या दोन वनडे सामन्यांमधील खेळपट्ट्यांवर चेंडूला चांगली स्विंग मिळाली. सुरुवातीच्या पाच-सहा षटकांनंतर स्विंग कमी झाला, तरी सीम मूव्हमेंट कायम राहिली. तसेच चेंडूला काही प्रमाणात अनपेक्षित उसळीही मिळत होती. कसोटी सामन्यांमध्येही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे वनडे मालिकेतील अनुभव कसोटीसाठी उपयुक्त ठरेल, असे कोटक म्हणाले.
भारत अ संघाचे सुरू असलेले चार दिवसीय सामने आणि नियोजित सराव शिबिर यांचाही कसोटी तयारीला फायदा होत आहे. भारत अ संघाकडून तीन सामने खेळलेल्या खेळाडूंना लाल चेंडूवर खेळण्याचा चांगला सराव मिळाला आहे. त्यामुळे फलंदाजांसह गोलंदाजांनाही न्यूझीलंडमधील परिस्थितीचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. गोलंदाजांना कोणत्या टप्प्यावर आणि कोणत्या टप्प्याच्या चेंडूने अधिक फायदा होतो, याचा अंदाज घेता आला आहे.
वनडे संघातून कसोटी संघात दाखल होणाऱ्या खेळाडूंसाठी ११ नोव्हेंबरपासून माउंट मॉन्गानुई येथे विशेष सराव शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात पाच ते सहा सराव सत्रे होणार असून, त्यातून कसोटी मालिकेपूर्वी खेळाडूंना तयारीची आणखी एक संधी मिळेल, असेही कोटक यांनी सांगितले.
दरम्यान, युवा फलंदाजांनी आक्रमक खेळाची शैली कायम ठेवतानाच सामन्याची परिस्थिती ओळखून निर्णय घेण्याची गरज असल्याचे कोटक यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचे पाच फलंदाज बाद झाल्यानंतर पावसाची शक्यता निर्माण झाली होती. अशा वेळी फलंदाजांनी आक्रमक फटके खेळण्याऐवजी काही काळ खेळपट्टीवर टिकून राहणे आवश्यक होते.
युवा फलंदाज नमनच्या फलंदाजीबाबत बोलताना कोटक म्हणाले की, त्याच्या आक्रमक खेळामुळेच त्याला भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याची नैसर्गिक शैली बदलण्याचा प्रशिक्षकांचा प्रयत्न नाही. मात्र, कोणत्या परिस्थितीत कोणता फटका खेळायचा आणि कधी संयम राखायचा, याचे भान त्याने विकसित करणे महत्त्वाचे आहे.
अंशुलच्या फलंदाजीबाबतही त्यांनी असेच मत व्यक्त केले. दुसऱ्या वनडेत केएल राहुल खेळपट्टीवर असताना अंशुलला मोठे फटके खेळण्याची घाई करण्याची गरज नव्हती. परिस्थिती, खेळपट्टी आणि संघाची गरज लक्षात घेऊन फलंदाजीच्या दृष्टिकोनात बदल करणे आवश्यक आहे. आक्रमकता कायम ठेवून योग्य वेळी संयम दाखवणे हीच युवा खेळाडूंसमोरील खरी कसोटी असल्याचे कोटक यांनी सांगितले.
दरम्यान, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना हॅमिल्टन येथे होणार असून, त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला १९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
