घरस्पोर्ट्सपाच वर्षांनी सिंधूची जागतिक फायनल्समध्ये धडक!

पाच वर्षांनी सिंधूची जागतिक फायनल्समध्ये धडक!

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर ती या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने बुधवारी तिच्या पात्रतेवर शिक्कामोर्तब केले.

९ ते १३ डिसेंबरदरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे ही स्पर्धा रंगणार आहे. वर्षभरातील कामगिरीच्या आधारे जागतिक क्रमवारीतील अव्वल आठ खेळाडू आणि जोड्यांना या स्पर्धेत संधी दिली जाते.

सिंधूने यापूर्वी २०२१ मध्ये या स्पर्धेत सहभाग घेतला होता. २०२२ मध्ये तिने पात्रता मिळवली होती; मात्र दुखापतीमुळे तिला माघार घ्यावी लागली होती. विशेष म्हणजे, बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. २०१८ मध्ये तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून ही कामगिरी केली होती.

अलीकडेच झालेल्या हायलो ओपन स्पर्धेचे विजेतेपद सिंधूसाठी महत्त्वाचे ठरले. या सुपर ५०० स्पर्धेतील विजयामुळे तिच्या खात्यात ९२०० गुण जमा झाले आणि तिने जागतिक क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेत सहावे स्थान गाठले. यंदाच्या मोसमातील हे तिचे दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी तिने फ्रेंच ओपनची अंतिम फेरीही गाठली होती.

२०१९ मध्ये जागतिक विजेतेपद पटकावणाऱ्या सिंधूने २०२२ नंतर प्रथमच एका हंगामात दोन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपदे मिळवली आहेत. वर्ल्ड टूर फायनल्सच्या तयारीसाठी तिने कोरिया ओपन आणि जपान मास्टर्स या स्पर्धांमधून माघार घेत विश्रांतीला प्राधान्य दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version