रिंकू सिंह जबरदस्त फिनिशर

रिंकू सिंह जबरदस्त फिनिशर

रिंकू सिंहला सध्याच्या भारतीय संघातला एक जबरदस्त फिनिशर मानलं जातं. बराच काळ संघाबाहेर असलेल्या रिंकूला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात संधी मिळताच त्याने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली.

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा प्रसिद्ध समालोचक सायमन डूल याने म्हटलं आहे की, रिंकू सिंहला आंतरराष्ट्रीय स्तरावर अजूनही पुरेसे सामने खेळायला मिळालेले नाहीत.

जिओहॉटस्टारवर बोलताना डूल म्हणाला,
“रिंकू सिंह हा जगातल्या सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक आहे. पण तरीही त्याला आतापर्यंत पुरेसे टी-२० सामने मिळाले नाहीत.”

तो पुढे म्हणाला,
“माझ्या मते रिंकूला फक्त फिनिशिंग रोलमध्येच खेळायला द्यायला हवं. तो खरंच अफलातून फिनिशर आहे. उंचीने थोडा लहान असला तरी ताकद जबरदस्त आहे. डावाच्या शेवटी तो ज्या पद्धतीने बॉलखाली येतो, त्यामुळे त्याला गोलंदाजी करणं खूप कठीण होतं.”

डूलने हेही म्हटलं की,
“रिंकूने आतापर्यंत भारताकडून किमान १०० टी-२० सामने खेळायला हवे होते.”

नागपूरमध्ये बुधवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात रिंकू सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने २० चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ४ चौकार मारत नाबाद ४४ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारताचा स्कोअर २३८ पर्यंत गेला आणि भारताने हा सामना ४८ धावांनी जिंकला.

याआधीही रिंकूने खालच्या फळीत फलंदाजी करत अनेकदा भारताला अडचणीतून बाहेर काढलं आहे.
आतापर्यंत खेळलेल्या ३६ टी-२० सामन्यांच्या २६ डावांत त्याने ३ अर्धशतकांसह १६५ च्या स्ट्राइक रेटने ५९४ धावा केल्या आहेत.

रिंकूच्या पुनरागमनामुळे भारताची टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठीची टीम आणखी मजबूत झाली आहे.

Exit mobile version