घरविशेषपाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सिडको टँकर्सवर जीपीएस लावणार

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सिडको टँकर्सवर जीपीएस लावणार

११ भरणा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर

नवी मुंबईतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी सिडको प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पाण्याचा गैरवापर, अनधिकृत वितरण आणि पुरवठ्यातील अनियमितता रोखण्यासाठी टँकरच्या हालचालींपासून ते पाणी भरणा केंद्रांपर्यंत कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उच्चस्तरीय बैठकांद्वारे पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्यांचा आढावा घेऊन त्या तातडीने सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या उपाययोजनांचा भाग म्हणून पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व ३४ टँकर्सवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे टँकरचा मार्ग आणि पाणी वितरणाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. याशिवाय, सर्व ११ प्रमुख टँकर भरणा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी ठेवली जात असून दररोजच्या पाणी वितरणाच्या नोंदी तपासल्या जात आहेत. जीपीएस आणि ओटीपी आधारित सुविधांसह डिजिटल जलपोर्टल विकसित केले जात आहे. तोपर्यंत दैनंदिन माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी गुगल शीट्सचा वापर सुरू करण्यात आला आहे. कळंबोलीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी, तर नियमित पाणीपुरवठ्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेशी समन्वय साधला जात आहे.

दरम्यान, पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी विकासकांना बांधकाम व विकासकामांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मनाई करण्यात आली आहे. टँकरमधील पाणी जलतरण तलावासाठी वापरले जात असल्याचे आढळल्यास संबंधित सोसायटीचा टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात येणार आहे. दक्षता विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचीही चौकशी सुरू असून गैरप्रकार सिद्ध झाल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध असून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन सिडकोने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version