घरविशेषभारतानंतर आता परदेशातही धावणार ‘वंदे भारत’

भारतानंतर आता परदेशातही धावणार ‘वंदे भारत’

३ ते ४ वर्षांत संपूर्ण ट्रेनसेट परदेशात पाठवण्याचे लक्ष्य

भारतीय रेल्वेची महत्त्वाकांक्षी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आता केवळ देशांतर्गत मार्गांवरच नव्हे, तर परदेशातही धावण्याची शक्यता आहे. भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केलेल्या या ट्रेनची निर्यात करण्याच्या दिशेने रेल्वे मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. येत्या तीन ते चार वर्षांत संपूर्ण वंदे भारत ट्रेनसेट परदेशात निर्यात करण्याचे लक्ष्य असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. त्यामुळे जागतिक रेल्वे बाजारपेठेत भारताची उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांना वेग मिळणार आहे.

बेंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवताना रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली. भारतीय रेल्वे केवळ देशांतर्गत प्रवाशांसाठी आधुनिक गाड्या तयार करत नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादन आणि तंत्रज्ञान विकसित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वंदे भारतच्या प्रत्येक नव्या आवृत्तीत तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा केली जात आहे. मागील आवृत्त्यांमधील अनुभवांचा वापर करून नव्या गाड्या अधिक प्रगत बनवण्यात येत आहेत.

स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्सलाही निर्यात

भारताने रेल्वे क्षेत्रातील निर्यातीला यापूर्वीच सुरुवात केली आहे. स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि अमेरिका यांसारख्या देशांना भारतीय कंपन्या रेल्वेचे महत्त्वाचे सुटे भाग आणि तांत्रिक उपकरणे निर्यात करत आहेत. यामध्ये प्रोपल्शन सिस्टीम आणि बोगी यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. आता या निर्यातीचा विस्तार करून संपूर्ण वंदे भारत ट्रेनसेट परदेशात पाठवण्याची भारताची योजना आहे.

हे ही वाचा:

सत्ताबदल लोकशाही मार्गानेच हवा!

पंजाबमध्ये ‘आप’ला गळती; आणखी एका आमदाराचा राजीनामा

प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’च्या ११ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

रेल्वे मंत्रालयाने मार्च २०२६ मध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून जानेवारी २०२६ पर्यंत भारतीय रेल्वेच्या रोलिंग स्टॉक आणि सुट्या भागांची निर्यात सुमारे २६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. देशातील उत्पादन कंपन्या आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या गरजांनुसार विविध प्रकारची रेल्वे उपकरणे तयार करत आहेत. यामध्ये रेल्वे इंजिन, प्रवासी डबे, ट्रॅक्शन मोटर्स, प्रोपल्शन सिस्टीम तसेच इतर तांत्रिक उपकरणे आणि सुट्या भागांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version