दिवाळी जवळ येताच बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढली असून, कपडे, दागिने, रोषणाई याचसोबत मिठाईच्या बाजारात लोकांची रेलचेल वाढल्याचे दिसत आहे. यंदा सोन्याचा वर्ख लावलेल्या प्रीमियम मिठाईने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले असून, या मिठाईच्या अवघ्या आठ तुकड्यांच्या डब्याची किंमत तब्बल १० हजार रुपयांच्या घरात आहे.
पारंपरिक मिठाईसोबतच आकर्षक पॅकिंग आणि वेगळ्या सजावटीच्या प्रीमियम मिठाईचे अनेक प्रकार यंदा बाजारात उपलब्ध झाले आहेत. सोन्याचा वर्ख असलेल्या मिठाईच्या महागड्या प्रकारामुळे विशेषतः या बाजारपेठेची चर्चा होत आहे. काही ठिकाणी लाखो रुपयांपर्यंत किमतीचे विशेष मिठाईचे प्रकारही उपलब्ध असल्याचे वृत्त आहे. दिवाळीनिमित्त कंपन्या, कॉर्पोरेट कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांकडून कर्मचारी, अधिकारी आणि व्यावसायिक भागीदारांना मिठाई भेट देण्याची परंपरा आहे. त्यामुळे छोट्या बॉक्सपासून ते आकर्षक प्रीमियम गिफ्ट हॅम्परपर्यंत विविध पर्याय बाजारात दाखल झाले आहेत.
हे ही वाचा:
सत्ताबदल लोकशाही मार्गानेच हवा!
पंजाबमध्ये ‘आप’ला गळती; आणखी एका आमदाराचा राजीनामा
प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’च्या ११ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री
दिल्लीच्या प्रदूषण मोहिमेत पहिल्याच दिवशी ६८ लाखांचा दंड
बदलत्या जीवनशैलीमुळे यंदा शुगरफ्री मिठाईलाही विशेष मागणी आहे. मधुमेह असलेल्या किंवा साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचवेळी पारंपरिक मिठाईची लोकप्रियताही कायम आहे. काजू कतली, बदाम बर्फी, पिस्ता रोल, ड्रायफ्रूट मिठाई, मोतीचूर लाडू आणि विविध बंगाली मिठाईच्या प्रकारांनी दुकाने सजली आहेत. आकर्षक रंग, वेगवेगळे आकार, चव आणि प्रीमियम पॅकिंगमुळे ग्राहकांचे लक्ष या मिठाईकडे वेधले जात आहे. सोन्याच्या वर्खापासून पारंपरिक घरगुती चवीच्या मिठाईपर्यंत विविध पर्यायांनी पनवेलची बाजारपेठ सजली असून, दिवाळीचा गोडवा अधिक खास बनला आहे.
