दिवाळीपूर्वी भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवारी झालेल्या व्यवहारात भारतीय शेअर बाजाराने मोठी झेप घेत दमदार तेजी नोंदवली. दिवसअखेर सेन्सेक्स १,२३३.२५ अंक म्हणजेच १.६६ टक्क्यांच्या वाढीसह ७५,६९२.७८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ३८७.७० अंक म्हणजेच १.६८ टक्क्यांच्या वाढीसह २३,४४०.८० अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजारातील या तेजीला कमोडिटी आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी मोठा आधार दिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी ऑइल अँड गॅस ५.९५ टक्के आणि निफ्टी कमोडिटीज ४.०१ टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक तेजी नोंदवणारे निर्देशांक ठरले. याशिवाय निफ्टी एनर्जीमध्ये ३.९२ टक्के, निफ्टी इन्फ्रामध्ये ३.७० टक्के, निफ्टी मेटलमध्ये ३.२१ टक्के, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये २.७० टक्के, निफ्टी पीएसईमध्ये २.३४ टक्के, निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंगमध्ये २.२३ टक्के आणि निफ्टी इंडिया डिफेन्समध्ये १.४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
दुसरीकडे, काही क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टी मीडियामध्ये ०.७६ टक्के, निफ्टी आयटीमध्ये ०.५० टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये ०.१४ टक्के आणि निफ्टी फार्मामध्ये ०.०७ टक्क्यांची घसरण झाली.
मोठ्या कंपन्यांच्या समभागांसोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांमध्येही खरेदीचा जोर दिसून आला. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ६८२.१५ अंक म्हणजेच १.१९ टक्क्यांच्या वाढीसह ५७,९८३.४० अंकांवर बंद झाला. तर निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांकात १३१.७० अंक म्हणजेच ०.७१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
हे ही वाचा:
प्रिमियम मिठाईच्या ८ तुकड्यांसाठी मोजा १० हजार
नेपाळमध्ये बर्फवृष्टीचा कहर, सहा भारतीय पर्यटक डोंगरात अडकले
रामलीला मैदानावरील राहुल गांधींची सभा फ्लॉप
पोल पोझिशन मिळविल्याबद्दल हॅमिल्टन खुश
सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया, एनटीपीसी, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, एल अँड टी, बीईएल, एचयूएल, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, इंटरग्लोब एव्हिएशन, एचडीएफसी बँक, एम अँड एम, ट्रेंट, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, टायटन, अदाणी पोर्ट्स, इटरनल, आयटीसी आणि एचसीएल टेक या कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले.
तर इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा आणि टीसीएस या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली.
बाजारातील या तेजीमागील कारणांबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची दमदार सुरुवात केली आहे. अपेक्षेपेक्षा चांगले आलेले दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल आणि देशांतर्गत सकारात्मक आर्थिक संकेत यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. ऑक्टोबर महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत झालेली वाढ ही सणासुदीच्या काळातील मजबूत मागणी दर्शवते. त्याचबरोबर सकल वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात झालेली वाढ देशांतर्गत उपभोग आणि आर्थिक घडामोडी मजबूत असल्याचे संकेत देते.
जागतिक स्तरावरील अनुकूल परिस्थितीचाही भारतीय बाजाराला फायदा झाला. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली नरमाई आणि अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा सुरू झालेल्या राजनैतिक प्रयत्नांमुळे ऊर्जा खर्च आणि भू-राजकीय तणावाबाबतच्या चिंता कमी झाल्या आहेत. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्राकडे जागतिक गुंतवणुकीचा कल बदलत असताना परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून झालेल्या खरेदीनेही भारतीय शेअर बाजाराला आधार दिला.
