गेली कित्येक वर्षे व्हीलचेअरवर आयुष्य काढणाऱ्या तेजसच्या जीवनप्रवासाला आता सुखद वळण मिळाले आहे. दिव्यांग मुलांना सन्मानाने, आत्मविश्वासाने आणि स्वावलंबी आयुष्य जगण्याची संधी देण्यासाठी काम करणाऱ्या ‘दीपस्तंभ’ संस्थेच्या संचालिका रश्मी भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेजसच्या उपचारांसाठीही प्रयत्न सुरू होते. मे महिन्यात झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तेजस पहिल्यांदाच स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याला आपल्या पायावर उभं राहिलेलं पाहून कुटुंबीयांसह त्याच्या उपचारासाठी झटणाऱ्या प्रत्येकाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
Osteogenesis Imperfecta या दुर्धर आजाराशी तेजस सामना करीत आहे. या आजारामुळे त्याच्या पायांवर गंभीर परिणाम झाला होता. गुडघा आणि घोट्यामध्ये काटकोन असलेला पाय घेऊन तो अनेक वर्षे व्हीलचेअरवर होता. स्वतःच्या पायावर सरळ उभं राहता येईल आणि एक दिवस चालता येईल, असं त्याला कदाचित स्वप्नातही वाटलं नसेल. मात्र, योग्य उपचार, शस्त्रक्रिया आणि अनेकांच्या अथक प्रयत्नांमुळे आज त्या स्वप्नाच्या दिशेने एक मोठं पाऊल पडले आहे.
मे महिन्यात तेजसवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरच्या उपचारांना मिळालेल्या प्रतिसादामुळे आज तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला. हा क्षण तेजससाठी जितका भावनिक होता, तितकाच त्याच्या कुटुंबीयांसाठी आणि त्याला साथ देणाऱ्या प्रत्येकासाठी समाधानाचा होता. तेजसचा उपचारांचा प्रवास अद्याप सुरूच आहे. दिवाळीनंतर त्याच्या दुसऱ्या पायाचे छोटे ऑपरेशन होणार असून, त्यानंतर दोन्ही हातांवरही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपचारांमुळे त्याचे दैनंदिन आयुष्य अधिक सुसह्य होण्याची आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची आशा निर्माण झाली आहे.
दिव्यांगत्वामुळे अनेक मुलांच्या शिक्षणाच्या संधी हुकतात. त्यासोबतच रोजच्या शारीरिक संघर्षालाही त्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, अशा मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांच्या आयुष्यात शिक्षणाची दालने खुली करणारी व्यवस्था उभी राहिली आणि त्यांचे दिव्यांगत्व सुसह्य करण्यासाठी मदतीचे हात पुढे आले, तर संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलू शकते. दीपस्तंभ संस्था याच उद्देशाने असंख्य दिव्यांग मुलांच्या शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनासाठी काम करत आहे. रश्मी भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य संधी मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक आधार उपलब्ध करून दिला जात आहे.
हे ही वाचा:
नोकरी सोडा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा!
इराणच्या पाच तेलवाहू जहाजांवर अमेरिकेचा हल्ला
उत्तर प्रदेशसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला
रोहन पारीखला दिले होते पंतप्रधानांच्या खोट्या सहीचे ओळखपत्र
तेजसच्या उपचारांच्या प्रवासातही अनेक संवेदनशील व्यक्ती आणि प्रोफेशनल्स त्याच्या पाठीशी उभे राहिले. डॉ. मंदार आगाशे, डॉ. जुई मांडके, डॉ. दिलीप चव्हाण यांच्यासह अनेक डॉक्टर आणि प्रोफेशनल्सनी आपल्या व्यावसायिक कौशल्याचा उपयोग या मुलांसाठी मोफत उपलब्ध करून दिला आहे.
