घरविशेषहिंजवडी-म्हाळुंगेतील वाहतूककोंडीने आयटी कर्मचारी हैराण

हिंजवडी-म्हाळुंगेतील वाहतूककोंडीने आयटी कर्मचारी हैराण

थेट मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील म्हाळुंगे-माण भागातील वाढती वाहतूककोंडी, अपुरे रस्ते आणि पथदिव्यांच्या समस्येमुळे आयटी कर्मचारी तसेच स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत म्हाळुंगे टाऊनशिप रहिवासी संघाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी आणि व्यावसायिक विकास झाला. त्यासोबत लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढली; मात्र त्या तुलनेत रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचा विकास झालेला नसल्याने कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

सकाळच्या कार्यालयीन वेळेत तसेच संध्याकाळी काम सुटल्यानंतर हिंजवडीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. शाळांच्या वेळेतही परिस्थिती अधिक बिकट होते. त्यामुळे आयटी कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही वाहतूककोंडीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा:
इन्स्टाग्रामवर सोने-रोकडचा दिखावा; यूट्यूबरच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास

शांततापूर्ण आंदोलनाचा विद्यार्थ्यांना अधिकार — सीजेआय सूर्यकांत

भारताच्या क्रिप्टो बाजारात तरुणाईची एन्ट्री

आधीच मर्कट त्यात मद्य प्याला…म्हण खरी ठरली!

या समस्येविरोधात २२ ऑगस्ट रोजी नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिल्याचे रहिवासी संघाचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतरही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. म्हाळुंगे-माण परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित २४ मीटर किंवा नगर नियोजन योजनेंतर्गत प्रस्तावित ३६ मीटर रस्ता तातडीने विकसित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सूस-म्हाळुंगे-हिंजवडी रस्त्याचे काम वेगाने सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

कायमस्वरूपी रस्त्यांची कामे पूर्ण होईपर्यंत गर्दीच्या वेळेत किमान दहा वाहतूक वॉर्डन तैनात करावेत, पर्यायी मार्गांचा वापर वाढवावा आणि प्रमुख चौकांवरील वाहतूक व्यवस्थापन सुधारावे, अशी मागणीही रहिवासी संघाने केली आहे. प्रशासनाने कालबद्ध कार्यवाही न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हिंजवडी हा पुण्याच्या महत्त्वाच्या आयटी पट्ट्यांपैकी एक असताना त्याच्या आसपासच्या पायाभूत सुविधांवर वाढता ताण दिसून येत आहे. त्यामुळे या वाहतूक प्रश्नावर आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे आयटी कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version