भारतातील क्रिप्टोकरन्सी बाजाराचे चित्र वेगाने बदलत असून, या बाजारात आता तरुण पिढीचा प्रभाव स्पष्टपणे वाढताना दिसत आहे. झेबपेच्या २०२६च्या पहिल्या सहामाहीतील अहवालानुसार, प्लॅटफॉर्मवर नव्याने दाखल झालेल्या वापरकर्त्यांपैकी तब्बल ५० टक्के वापरकर्ते जेन झी म्हणजेच १८ ते २४ वयोगटातील तरुण आहेत. जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत झेबपेवर एक लाख वीस हजारांहून अधिक नवीन वापरकर्ते जोडले गेले. त्यामुळे भारतातील क्रिप्टो बाजार आता केवळ अनुभवी गुंतवणूकदारांपुरता मर्यादित न राहता तरुणांच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, जेन झी गुंतवणूकदारांमध्ये क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याचा कल विक्रीच्या तुलनेत तब्बल दहापट अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या तरुण गुंतवणूकदारांमध्ये सोलाना या डिजिटल चलनाला विशेष पसंती मिळताना दिसत आहे. मात्र, तरुण गुंतवणूकदार केवळ झटपट नफा मिळवण्यासाठी क्रिप्टोमध्ये प्रवेश करत आहेत, असे सरसकट म्हणता येणार नाही. आकडेवारीनुसार, मोठ्या संख्येने वापरकर्ते क्रिप्टोकरन्सी खरेदी करून ती काही काळ आपल्या खात्यात ठेवण्याला प्राधान्य देत आहेत.
हे ही वाचा:
आधीच मर्कट त्यात मद्य प्याला…म्हण खरी ठरली!
भारताच्या पुरुष कबड्डी संघाची पुन्हा सुवर्णभरारी!
विराटचा शेवटचा वर्ल्ड कप; भारतासाठी सर्वस्व पणाला लावणार!
इस्लामाबाद सील! रस्त्यांवर कंटेनर, लोखंडी काटे अन् २२ हजार सुरक्षारक्षक
झेबपेच्या आकडेवारीनुसार, २०२६च्या पहिल्या सहामाहीत सुमारे ६३ टक्के वापरकर्त्यांनी क्रिप्टोकरन्सी आपल्या खात्यात ठेवली, मात्र त्या कालावधीत कोणताही व्यवहार केला नाही. तर सुमारे २९ टक्के वापरकर्त्यांनी क्रिप्टोकरन्सी आपल्या खात्यात ठेवण्यासोबतच खरेदी-विक्रीचे व्यवहारही केले. यावरून भारतातील क्रिप्टो बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणारा वर्गही तयार होत असल्याचे दिसते.
क्रिप्टो बाजाराचा विस्तार केवळ तरुणांपुरता मर्यादित नसून त्याचा भौगोलिक विस्तारही वेगाने होत आहे. झेबपेवर झालेल्या नव्या नोंदणींपैकी सुमारे ६२ टक्के नोंदणी टियर-२ आणि टियर-३ शहरांमधून झाली. टियर-३ शहरांचा स्वतंत्र वाटा जवळपास २१ टक्के राहिला. त्यामुळे मुंबई, दिल्ली, बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांपलीकडे क्रिप्टोकरन्सीची उत्सुकता आता छोट्या शहरांमध्येही वाढत असल्याचे स्पष्ट होते.
याच काळात नियमितपणे क्रिप्टो बाजारात सक्रिय असलेल्या वापरकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणावर व्यवहार केले. सहा महिन्यांपर्यंत सातत्याने सक्रिय असलेल्या वापरकर्त्यांचा व्यवहाराचा आकार केवळ एका महिन्यासाठी सक्रिय असलेल्या वापरकर्त्यांच्या तुलनेत सुमारे २१ पट अधिक होता. म्हणजेच, क्रिप्टो बाजारात एकदा प्रवेश केल्यानंतर त्यात सातत्याने सक्रिय राहणाऱ्या गुंतवणूकदारांचा सहभाग लक्षणीय असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
या संपूर्ण बाजारात बिटकॉइनचे महत्त्व मात्र कायम आहे. झेबपेच्या आकडेवारीनुसार, सुमारे ३० टक्के गुंतवणूकदारांचा कल बिटकॉइनकडे राहिला. त्यानंतर विविध जुन्या क्रिप्टोकरन्सी आणि वेगवेगळ्या डिजिटल मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या वापरकर्त्यांचा समावेश आहे. व्यवहाराच्या दृष्टीने अमेरिकी डॉलरशी संबंधित डिजिटल चलन असलेल्या यूएसडीटीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. बिटकॉइन, इथेरियम, एक्सआरपी आणि सोलाना यांचाही व्यवहारांमध्ये मोठा सहभाग राहिला.
या अहवालातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेअर-वन प्रकारातील डिजिटल मालमत्तांचा व्यवहारातील मोठा वाटा. वर्गीकृत व्यवहारांमध्ये अशा मालमत्तांचा वाटा जवळपास ९० टक्के होता. त्याचवेळी मेमेकॉइनसारख्या अत्यंत चढ-उतार असलेल्या डिजिटल मालमत्तांमध्येही गुंतवणूकदारांचा सहभाग दिसून आला.
