आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली होती. परीक्षेदरम्यान साहिलने मोबाइल फोनचा वापर केला आणि प्रश्नपत्रिका चॅट जीपीटीवर अपलोड करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर साहिलने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. अशातच आता संस्थेने प्रशासकीय कारवाई करत ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक सूर्यनारायण डूल्ला यांचे अधिष्ठातापद तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष बी. केदारे यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत यापूर्वी जारी केलेले निवेदन मागे घेत संस्थेने औपचारिक माफीही मागितली आहे.
आयआयटी मुंबईने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साहिलच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत यापूर्वी करण्यात आलेली विधाने योग्य तपास प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच करण्यात आली होती. त्यामुळे मृत्यूपूर्वीच्या घटनांशी संबंधित तपशील अशा प्रकारे मांडणे योग्य नव्हते, असे संस्थेने मान्य केले. या प्रकरणाची योग्य अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याचेही आयआयटी मुंबईने स्पष्ट केले. संस्थेने आपल्या आधीच्या पत्रव्यवहारातील वक्तव्यांबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
साहिल वाकोडे हा ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी होता. १८ सप्टेंबर रोजी त्याने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर आयआयटी मुंबईने १९ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात परीक्षेदरम्यान त्याच्याकडे मोबाइल फोन आढळल्याचे म्हटले होते. मात्र, त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती. तसेच प्रशिक्षक आणि विभागप्रमुखांनी त्याच्याशी चर्चा करून त्याचे समुपदेशन केले आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे आश्वासन दिल्याचे संस्थेने म्हटले होते.
हे ही वाचा:
गणेश अन्नदानाच्या ठिकाणी हाडे-मांसाचा कचरा; तीन जण ताब्यात
“गणवेश नको, सेवा सुधारा!” पीआयएच्या नव्या गणवेशावरून वाद
मागण्या पूर्ण होईपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार नाही!
विखे पाटील घराण्याची लेक स्वीडनच्या संसदेत
दरम्यान, आयआयटीमुंबई फॅकल्टी फोरमने प्राध्यापक सूर्यनारायण डूल्ला यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. संस्थेच्या सिनेटने मंजूर केलेल्या शैक्षणिक धोरणांनुसार डूल्ला आपली जबाबदारी पार पाडत होते, असे फोरमने म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी कॅम्पस प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यात छळ आणि जातीय शेरेबाजीचे आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, प्राध्यापक सूर्यनारायण डूल्ला यांनी मागील तीन महिन्यांपासून विद्यार्थ्याबाबत जातीय स्वरूपाच्या टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी प्रा. डूल्ला यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
