घरविशेष‘रेड अलर्ट’चा इम्पॅक्ट! मुंबईची गती मंदावली, लोकल-डबेवालेही थांबले

‘रेड अलर्ट’चा इम्पॅक्ट! मुंबईची गती मंदावली, लोकल-डबेवालेही थांबले

अनेक सखल भाग जलमय

मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रेल्वे, रस्ते, शिक्षण आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे सेवा आणि द्रुतगती महामार्गही बंद करावे लागले आहेत. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले. पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवेला मोठा फटका बसला. काही ठिकाणी गाड्या उशिराने धावल्या, तर अनेक प्रवाशांना स्थानकांवर तासन्‌तास अडकून राहावे लागले. पश्चिम रेल्वेची सेवा वसईपर्यंतच सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या सेवाही विलंबाने धावत आहेत. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळत असून, सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही मुंबई आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली.

मुंबई आणि उपनगरांतील गंभीर पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने सोमवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. मुंबई विद्यापीठात आज सोमवारी एलएलएम, एमएससी, एम. कॉमच्या परीक्षा होणार होत्या. परंतु मुंबईतील मुसळधार पावसामुळे विद्यापीठ प्रशासनाने आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी दिली आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा कायम ठेवला आहे. जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सखल भागात पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, रेल्वे आणि महामार्गावरील प्रवास टाळावा तसेच अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

हे ही वाचा:

अंबादास दानवे जिंकले… पण महायुतीतून

बरे झाले, उद्धव ठाकरेंना श्रीरामाची आठवण झाली!

विशाखापट्टणम किनाऱ्याजवळ सहा मच्छीमार बेपत्ता

६१ वर्षीय आमिर खान तिसऱ्यांदा हिंदू स्त्रीशीच झाला विवाहबद्ध

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ६ जुलै रोजी मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. डबेवाले संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितलं की, विरार-वसई क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या व्यतिरिक्त अनेक रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी साचलं आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणात्सव सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२५ वर्षांच्या सेवेत पहिल्यांदा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version