संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) फ्लायदुबईच्या एफझेड १०७३ या विमानाच्या कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्याला ‘दहशतवादी हल्ला’ म्हणून संबोधले आहे. ओमानी सहवैमानिकाने विमानातील आपत्कालीन कुऱ्हाडीचा वापर करून भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती यूएईकडून देण्यात आली आहे.
यूएईच्या अॅटर्नी जनरलच्या निवेदनानुसार, सहवैमानिकाने कॉकपिटमध्ये ठेवलेल्या आपत्कालीन कुऱ्हाडीने कॅप्टन स्मित माछर यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याने विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याच्या वेळी विमानात १७४ प्रवासी होते. या घटनेनंतर प्रवासी आणि विमानातील इतर क्रू सदस्यांनी हस्तक्षेप करून सहवैमानिकाला काबूत आणले.
हे ही वाचा:
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत तेल टँकरवर हल्ला
स्मितवर हल्ला करणारा ओमानी वैमानिक हमाम अल-हम्मामी
दरम्यान, यूएईचे वरिष्ठ राजनैतिक सल्लागार अन्वर गर्गाश यांनीही ‘एक्स’वरील पोस्टमध्ये या घटनेचे वर्णन ‘धोकादायक दहशतवादी कृत्य’ असे केले. गर्गाश यांनी लिहिले की, फ्लायदुबईचे भारतीय वैमानिक स्मित माछर यांनी अत्यंत धोकादायक दहशतवादी कृत्य आणि संभाव्य मोठ्या दुर्घटनेच्या परिस्थितीत धैर्य आणि जबाबदारीचे दर्शन घडवले. त्यांच्या व्यावसायिकतेचे आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही दाखवलेल्या नैतिक धैर्याचे कौतुक केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. त्यांनी स्मित माछर यांना खरा नायक संबोधले.
या घटनेतील सहवैमानिकाची ओळख आता हमाम अल-हमामी अशी झाली आहे. सौदी अरेबियातील सरकारी मालकीच्या माध्यम संस्थेने, अल-अरबियाने त्याला ओमानी नागरिक असल्याचे म्हटले आहे. तपासाशी संबंधित माहिती असलेल्या अन्य तीन व्यक्तींनीही, ज्यामध्ये आखाती देशातील एका राजनैतिक अधिकाऱ्यासह एका पाश्चात्त्य राजनैतिक अधिकाऱ्याचा समावेश आहे, असोसिएटेड प्रेसला अल-हमामीची ओळख पुष्टी केल्याचे सांगितले आहे.
त्याची ओळख समोर आल्यानंतर त्याच्या पूर्वीच्या कारकिर्दीचीही नव्याने चौकशी सुरू झाली आहे. एपीच्या वृत्तानुसार, त्याच्या कथित कट्टरतावादी विचारांबाबत चिंता निर्माण झाल्यानंतर ओमानने यापूर्वी त्याला विमान उडवण्यास बंदी घातली होती.
