दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी सोमवारी गंभीर आरोप करत पंजाबमधील शेतांना जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीविरोधात हा कट रचला जात असल्याचे त्यांनी म्हटले. आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिवाळीच्या रात्री दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी भाजप सरकारकडून जाणीवपूर्वक बदलण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर काही तासांतच मिश्रा यांनी हे प्रत्युत्तर दिले.
सौरभ भारद्वाज यांनी दावा केला होता की, दिवाळीच्या रात्री दिल्लीतील अनेक भागांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३,००० च्या पुढे गेला होता. मात्र, सरकारी आकडेवारीत प्रदूषणाची पातळी प्रत्यक्षापेक्षा कमी दाखवण्यात आली. या आरोपांना प्रत्युत्तर देताना कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित लोकांनी शेतांना आग लावल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणात आम आदमी पक्षाच्या नेत्यांची कथित भूमिका तपासण्याची मागणी केली.
कपिल मिश्रा म्हणाले की, पंजाबमधील काही शेतकऱ्यांनी त्यांना आणि दिल्ली सरकारच्या इतर प्रतिनिधींना फोन करून रात्रीच्या वेळी शेतांना आग लावली जात असल्याची तक्रार केली आहे. त्यांनी दावा केला की, उपग्रहाद्वारे मिळालेल्या आकडेवारीनुसार ७ नोव्हेंबर रोजी शेतांना आग लागण्याच्या १२५ घटना नोंदवण्यात आल्या होत्या. तर दिवाळीच्या रात्री ही संख्या वाढून १,२०० वर पोहोचली. हा शेतकरी आणि दिल्लीतील जनतेविरोधात रचलेला कट आहे, असा आरोप त्यांनी केला.
कपिल मिश्रा यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी ज्या भागांना भेटी दिल्या, त्याच परिसरांमध्ये आगीच्या घटना घडत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच संबंधित नेत्यांचे फोन रेकॉर्ड तपासण्याची मागणीही केली. दिवाळीला बदनाम करण्याची मोहीम दोन दिवस आधीपासूनच सुरू झाली होती, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
भारताविरोधात एकत्र या! हाफिज सईदचा मुलगा बरळला
एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग चिनी गुप्तचर यंत्रणेच्या निशाण्यावर?
फटाक्यांचा रेल्वे सिग्नल यंत्रणेला फटका; पश्चिम रेल्वे उशिराने
फडणवीसांची ती ‘दिवाळी भेट’ अत्यंत हृदयस्पर्शी!
पंजाबमध्ये ८ नोव्हेंबर रोजी शेतांना आग लागण्याच्या १,१५२ घटना नोंदवण्यात आल्या. यंदाच्या हंगामातील एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे आतापर्यंत शेतांना आग लागण्याच्या घटनांची एकूण संख्या ४,४५९ वर पोहोचली आहे. राज्यातील सुमारे ९१ टक्के भातशेतीची कापणी पूर्ण झाली असतानाही आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रोटोकॉलनुसार संकलित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, नोंदवलेल्या घटनांशी संबंधित २,९९८ शेतांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,३१७ ठिकाणी प्रत्यक्षात पराली जाळल्याचे निष्पन्न झाले. तरनतारन जिल्ह्यात सर्वाधिक ६८४ घटना नोंदवण्यात आल्या. त्यापैकी ३०६ घटनांमध्ये प्रत्यक्ष पराली जाळल्याचे निश्चित झाले. तसेच सर्वाधिक एफआयआर आणि पर्यावरणीय नुकसानभरपाईची सर्वाधिक वसुलीही याच जिल्ह्यात झाली.
दिल्लीतील प्रदूषणाच्या आकडेवारीवर आम आदमी पक्षाचे प्रश्न
एकीकडे कपिल मिश्रा यांनी पंजाबमधील शेतांना लागणाऱ्या आगींना दिल्लीतील प्रदूषणासाठी जबाबदार धरले, तर दुसरीकडे सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीतील सरकारी प्रदूषणविषयक आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
स्वतंत्र प्रदूषण निरीक्षण यंत्रणांच्या आकडेवारीचा हवाला देत भारद्वाज यांनी दिल्लीतील अनेक ठिकाणी एक्यूआय ३,००० च्या पुढे गेल्याचा दावा केला. एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत त्यांनी म्हटले, “एक्यूआय ३,००० पार. प्रदूषणाची पातळी ३,००० च्या पुढे नेण्याचे संपूर्ण श्रेय या बांधवांना जाते.”
