जगातील आघाडीची चिप निर्मिती कंपनी एनव्हिडिया (Nvidia) चे सहसंस्थापक आणि सीईओ जेन्सेन हुआंग हे चिनी गुप्तचर यंत्रणेच्या निशाण्यावर होते का, याची चौकशी आता कंपनीने सुरू केली आहे. एका चिनी महिला व्यावसायिकासोबत हुआंग यांचे जवळचे संबंध असल्याच्या वृत्तानंतर हे प्रकरण समोर आले आहे. संबंधित महिला चीनसाठी गुप्त माहिती गोळा करत असल्याचा संशय अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना असल्याचे सांगितले जात आहे.
एलिस हुआंग नावाच्या या महिलेचे चीनशी संबंध असल्याचा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. ती सिंगापूरस्थित मेगास्पीड इंटरनॅशनल (Megaspeed International) या कंपनीची माजी वरिष्ठ अधिकारी होती. विशेष म्हणजे, ही कंपनी एनव्हिडियाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आवश्यक असलेल्या चिप्स खरेदी करते. अमेरिकेच्या निर्यात निर्बंधांना चुकवून चीनला प्रगत एआय चिप्स मिळवून देण्यात या कंपनीची भूमिका होती का, याचीही तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली होती.
या प्रकरणानंतर एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने स्वतंत्र चौकशीचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र संचालकांची समिती बाहेरील कायदेशीर तज्ज्ञांच्या मदतीने या प्रकरणाची चौकशी करणार आहे. कंपनीने स्पष्ट केले की, आतापर्यंत अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा किंवा कंपनीची गोपनीय माहिती धोक्यात आल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. मात्र, सर्व उपलब्ध माहितीची तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, जेन्सेन हुआंग यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना संदेश पाठवून पत्नीशी प्रतारणा केल्याची कबुली दिली आहे. आपल्या कृतीमुळे पत्नी आणि मुलांना त्रास झाल्याचे सांगत त्यांनी माफी मागितली. तसेच कंपनीतील सहकारी आणि भागधारकांचाही विश्वास पुन्हा मिळवण्याची ग्वाही दिली आहे. या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
कुख्यात गँगस्टर गुरविंदर इथिओपियातून भारतात प्रत्यार्पित
इस्रायलमध्ये गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण
रामायण: पार्ट वन’ची तिसऱ्या दिवशी ६९.८० कोटींची कमाई
चीनचा धोका म्हणूनच सियांग धरणाचे धोरण
या प्रकरणाचे पडसाद अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या काही खासदारांनी हुआंग यांना या महिन्यात काँग्रेससमोर हजर राहून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. चीनला संवेदनशील अमेरिकन तंत्रज्ञान आणि माहिती मिळण्याचा धोका निर्माण झाला होता का, हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुआंग यांची पाठराखण केली आहे. हुआंग हे सन्माननीय व्यक्ती असून त्यांनी अमेरिकेसाठी चांगले काम केले आहे, असे ट्रम्प म्हणाले.
