अॅप-बेस्ड कॅब, ऑटो आणि इतर ऑनलाइन वाहतूक सेवांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महिला आयोगाने महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महिलांना प्रवासादरम्यान सुरक्षित वातावरण मिळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी कॅब कंपन्यांनी अधिक कठोर सुरक्षा व्यवस्था लागू करावी, अशी शिफारस आयोगाने केली आहे. ड्रायव्हरची ओळख, वाहनाची माहिती, प्रवासाचा मार्ग आणि आपत्कालीन मदत यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
या मार्गदर्शक सूचनांनुसार, अॅपवर दाखवण्यात आलेला ड्रायव्हर आणि वाहन प्रत्यक्षात प्रवाशाला घेण्यासाठी आलेल्या ड्रायव्हर आणि वाहनाशी जुळणे आवश्यक आहे. ड्रायव्हरची पोलीस पडताळणी आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जावी, तसेच ठराविक काळाने पुन्हा पडताळणी केली जावी, अशी सूचना करण्यात आली आहे. ड्रायव्हरना महिलांशी योग्य पद्धतीने वागणे, छळाच्या घटना टाळणे आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे याबाबत प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर हल्ला; ११ भारतीय जखमी
ते वगळलेले १३ कोटी मतदार…मृत, पत्ते बदललेले, दुबार नोंदी असलेले!
न्यूट्रिनो कणांच्या शोधासाठी फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल
डॉक्टरची पदवी नाही, तरी थाटात दवाखाने
महिलांच्या सुरक्षेसाठी कॅबमध्ये एसओएस सुविधा अधिक प्रभावी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान वाहन ठरलेल्या मार्गापासून अचानक दूर गेले किंवा संशयास्पद ठिकाणी बराच वेळ थांबले, तर प्रवासी आणि संबंधित कंपनीला तातडीचा अलर्ट मिळावा, अशी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. आपत्कालीन संदेश मिळाल्यानंतर कंपनीच्या नियंत्रण कक्षाने शक्य तितक्या लवकर प्रतिसाद द्यावा आणि एसओएस बटण प्रवाशाला सहज वापरता येईल अशा ठिकाणी असावे, अशी सूचना आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महिलेला सुनसान किंवा असुरक्षित ठिकाणी उतरवू नये आणि शक्यतो अॅपवर निवडलेल्या ठिकाणीच प्रवास समाप्त करावा, असे आयोगाने म्हटले आहे.
प्रवासाची माहिती कुटुंबातील किंवा विश्वासू व्यक्तीला शेअर करण्याची सुविधा, ड्रायव्हरचे फोटो व्हेरिफिकेशन आणि उपलब्धतेनुसार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय यांसारख्या सुविधांवरही भर देण्यात आला आहे. तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची शिफारस करण्यात आली असून, महिलांचा अॅप-बेस्ड कॅबवरील प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी कंपन्या आणि प्रशासनाने या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे राष्ट्रीय महिला आयोगाने स्पष्ट केले आहे.
