तेलवाहू जहाजाने ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी; ३ जूनला विशाखापट्टणममध्ये पोहचणार

‘निसोस केरोस’ नावाचे जहाज अरबी समुद्रात दाखल

तेलवाहू जहाजाने ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी; ३ जूनला विशाखापट्टणममध्ये पोहचणार

भारतासाठी पेट्रोलियम घेऊन येणाऱ्या एका तेलवाहू जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनी पार केली आहे. सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या विविध वेबसाइट्समधून ही माहिती समोर आली आहे. ‘निसोस केरोस’ नावाचे हे जहाज विशाखापट्टणमकडे येत असून, ३ जूनपर्यंत ते तेथे पोहोचण्याची शक्यता आहे. मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेले हे जहाज २१ मे रोजी शारजाह येथून रवाना झाले होते. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ६ वाजता हे जहाज भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळील उत्तर अरबी समुद्रात दिसून आले.

दरम्यान, इराणच्या सरकारी वृत्तसंस्था IRNA ने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने गेल्या २४ तासांत २३ व्यापारी जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करण्यास परवानगी दिली. यात तेलवाहू जहाजे आणि कंटेनर जहाजांचा समावेश होता. इराणी लष्कराच्या माहितीनुसार, सर्व जहाजांची हालचाल इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदल अधिकाऱ्यांशी औपचारिक समन्वयानंतरच करण्यात आली. मात्र, या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी जहाजांकडून कोणते शुल्क आकारण्यात आले का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जहाजांची माहिती देणाऱ्या ‘ऑकविसर’ संस्थेनुसार, विशाखापट्टणमकडे येणाऱ्या ‘निसोस केरोस’ या जहाजाचे मालक अरेथुसा शिपिंग कॉर्पोरेशन असून, त्याचे संचालन किक्लेड्स मॅरिटाईम कॉर्पोरेशन करत आहे. हुंडई कंपनीने तयार केलेले हे जहाज ३३३ मीटर लांब असून, त्याची वहन क्षमता ३,१८,७४४ टन किंवा ३,३८,६४८ घनमीटर इतकी आहे.

इराणने यापूर्वीच होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारण्याचा इशारा दिला होता. याच महिन्यात इराणने सागरी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटी’ नावाची स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची घोषणा केली होती. संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय जलमार्गातून मार्गक्रमण करण्यासाठी शुल्क आकारणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेने इराणकडे होर्मुझ सामुद्रधुनीतील मुक्त वाहतूक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर बॉम्बहल्ले केल्यानंतर इराणने या मार्गात समुद्री स्फोटके पेरल्याचा तसेच जहाजांवर हल्ले केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

नाशिकनंतर आता कॉर्पोरेट जिहाद नरिमन पॉईंटला! स्टेट बँकेत हिंदू महिला टार्गेट

घरात एसीचा स्फोट होऊन स्पर्धा आयोगाचे पहिले प्रमुख, धनेंद्र कुमार दगावले

एअर इंडिया, इंडिगोकडून देशांतर्गत विमानसेवेत कपात

ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना अटक

होर्मुझ सामुद्रधुनीतील मुक्त वाहतूक हा इराण युद्ध समाप्तीच्या चर्चांमधील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी म्हटले, “ही सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली राहील.” इराणच्या कारवाईमुळे जगातील सुमारे २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जागतिक ऊर्जा आणि आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी ट्रम्प यांनी ओमानलाही इशारा दिला. इराणसोबत सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारण्याबाबत कोणताही करार केल्यास अमेरिका ओमानवर कारवाई करू शकते, अशी धमकी त्यांनी दिली. ओमान हा देश होर्मुझ सामुद्रधुनीच्या दुसऱ्या बाजूला इराणसमोर स्थित आहे.

Exit mobile version