कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून पुढे आलेल्या निशू आझाद नावाच्या मुलीविरोधात आता ती राहात असलेल्या सोसायटीतील सर्व सदस्य एकवटले आहेत. तिच्यामुळे सोसायटीत एकप्रकारे अशांततेचे वातावरण तयार झाले असून त्यामुळे आमच्या मुलाबाळांबाबत चिंता वाटू लागली आहे, असे सोसायटीतील सदस्य बोलू लागले आहेत.
यासंदर्भात या सदस्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून त्यातून निशू आझादच्या कुटुंबाला सगळे कंटाळले आहेत आणि त्यांना या सोसायटीतून हाकलून लावण्याची मागणी हे सदस्य करत आहेत. त्यात प्रामुख्याने महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
निशू आझादने तेव्हा जंतर मंतर येथील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अत्यंत अभद्र व्हीडिओ केला होता. त्यानंतर ती चर्चेत आली. त्याच आंदोलनादरम्यान स्वतंत्र भारद्वाज या तरुणाने मारल्याचा दावा तिचे वडीलही करत होते. स्वतंत्र भारद्वाज याने एका मुलाखतीतही आपण तिच्या वडिलांचे डोके फोडल्याचा दावा केला होता. पण आंदोलनादरम्यानच्या व्हीडिओत तिचे वडीलही स्वतंत्र भारद्वाजला मारहाण करत असल्याचे समोर आले. आता स्वतंत्र भारद्वाजला अटक करण्यात आली आहे. मात्र आता निशू आझादने आपल्या घरावर हल्ला केला जात असल्याचा नवा व्हीडिओ केला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या घरावर दगडफेक केली जात असल्याचा व्हीडिओ तिने केला आहे. आपल्याला संरक्षण हवे अशीही तिची मागणी आहे. माझ्या पालकांना काही झाले तर मी काय करू, असे ती व्हीडिओत म्हणत आहे.
हे ही वाचा:
मणिपूरमध्ये १० किलोचा आयईडी केला निकामी
लखीमपूरमध्ये चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या खलीलचे केले एन्काऊंटर
अमेरिकेत अमेझॉनच्या कार्गो विमानाचा अपघात; ५ जणांचा मृत्यू
पालघरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण
निशू आझादच्या या सातत्याने केल्या जाणाऱ्या व्हीडिओमुळे गाझियाबाद येथील तिच्या निवासस्थानाच्या परिसरात एक अशांतता, अस्वस्थता निर्माण झाल्याची स्थानिकांची भावना आहे.
स्थानिकांनी एका यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतींमध्ये या मुलींमुळे आमचे जीवन त्रासदायक बनल्याचे लोक म्हणत आहेत. काही पुरुष सदस्यांनी या कुटुंबाला हाकलून लावा अशी मागणी केली आहे. तर एका महिलेने म्हटले की, आमच्या मुलांचे भवितव्य मुलीमुळे धोक्यात आले आहे. ती काहीही बोलते, आमची मुले तिच्या संपर्कात आली तर काय होईल?
एक महिला म्हणाले की, जर ही हिंदू देवीदेवतांबद्दल बोलते तर आमच्यासारख्या सामन्यांचे काय? ती पंतप्रधानांबद्दलही काहीही बोलते. त्यामुळे या परिसरात आझाद कुटुंबाने राहू नये, अशी मागणी केली जात आहे.
एका महिलेने सांगितले की, आमची मुलेही लहान आहेत त्यांनाही या निशूच्या व्हीडिओमुळे वाईट सवयी लागतील. पिढ्या खराब होतील त्यामुळे या कुटुंबाला इकडून हाकलून लावा.
एक महिला म्हणाली की, एक १४ वर्षांची मुलगी काहीही बोलू शकते तर ती काहीही करू शकते.
