पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडोदरा दौऱ्यापूर्वी त्यांच्या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच ‘बुक माय शो’ या डिजिटल व्यासपीठावरून मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नोंदणी सुरू झाल्यानंतर अवघ्या एका तासात कार्यक्रमातील सर्व जागा बुक झाल्या. त्यानंतर ४२ हजारांहून अधिक नागरिकांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले.
वडोदरा महानगरपालिकेने या कार्यक्रमासाठी डिजिटल नोंदणी व्यवस्था राबवली आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेशासाठी नोंदणीकृत नागरिकांना ‘बुक माय शो’ खात्यावर डिजिटल एम-तिकीट देण्यात येणार असून, त्यावर थेट क्यूआर कोड असेल. नोंदणीपासून पडताळणी, प्रवेश आणि आसनव्यवस्थेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया वेगवान होण्यासोबतच गर्दीचे व्यवस्थापन अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या वडोदरा दौऱ्यात ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. यातील प्रमुख आकर्षण म्हणजे पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेचे (Western Dedicated Freight Corridor) तीन टप्पे. सुमारे ३२६ किलोमीटर लांबीच्या या टप्प्यांवर २०,७०० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. न्यू साणंद-न्यू मकरपुरा, न्यू उमरगाव-न्यू सफाळे आणि न्यू सफाळे-न्यू जेएनपीटी या मार्गांचा यात समावेश आहे. या टप्प्यांमुळे औद्योगिक केंद्रे आणि बंदरांदरम्यान मालवाहतूक अधिक वेगवान होणार असून, जेएनपीटीपर्यंत थेट मालवाहतूक जोडणी मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे निर्यात-आयात मालाची वाहतूक वेगाने होण्याबरोबरच वाहतूक खर्च कमी होण्यास आणि मुंबईच्या रेल्वे मार्गावरील मालवाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय गुजरात आणि मध्य प्रदेशातील रेल्वे जोडणी मजबूत करणाऱ्या नवीन मार्गांचेही लोकार्पण करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
मणिपूरमध्ये १० किलोचा आयईडी केला निकामी
लखीमपूरमध्ये चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या खलीलचे केले एन्काऊंटर
अमेरिकेत अमेझॉनच्या कार्गो विमानाचा अपघात; ५ जणांचा मृत्यू
पालघरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात सुमारे ९,७०० कोटी रुपयांच्या तीन रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच सुमारे १,७८० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणीही होणार आहे. त्यामुळे वडोदरा कार्यक्रमाला राजकीय आणि सार्वजनिक सहभागासोबतच रेल्वे, मालवाहतूक आणि रस्ते पायाभूत सुविधांच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
