भारतात गुंतवणुकीचे पर्याय विस्तारत असताना पारंपरिक शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांपलीकडे जाऊन गुंतवणूक करण्याकडे मोठ्या गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. ‘पर्यायी गुंतवणूक निधी’ हा त्यापैकीच एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. खासगी कंपन्या, नवउद्योग, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि विविध पर्यायी मालमत्तांमध्ये गुंतवणुकीची संधी देणाऱ्या या निधीकडे उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती आकर्षित होत आहेत. गुंतवणुकीत विविधता आणणे आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे, हा या पर्यायामागील प्रमुख उद्देश आहे.
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने पर्यायी गुंतवणूक निधीसाठी नियमावली तयार केली असून, गुंतवणुकीचे स्वरूप आणि उद्दिष्टे यानुसार त्यांचे तीन प्रकार आहेत. पहिल्या श्रेणीतील निधी नवउद्योग, उद्यम भांडवल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांत गुंतवणूक करतो. दुसऱ्या श्रेणीतील निधी प्रामुख्याने खासगी कंपन्यांमधील भागभांडवल आणि कर्जरोख्यांमध्ये, तर तिसऱ्या श्रेणीतील निधी अधिक गुंतागुंतीच्या गुंतवणूक धोरणांद्वारे विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतो. सामान्यतः या निधीत किमान एक कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असल्याने हा पर्याय प्रामुख्याने मोठी आर्थिक क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी आहे.
हे ही वाचा:
चार वर्षे वनवास, मेहनतीवर विश्वास
‘समुद्र मंथन’ योजनेतून खोल समुद्रातील तेल-वायू उत्खननाला बळ
मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायरन पोलार्ड
जागतिक अनिश्चिततेतही भारतीय उद्योगांचा आत्मविश्वास वाढला
मात्र, पर्यायी गुंतवणूक निधीत पैसे गुंतवताना जोखीम आणि आर्थिक मर्यादा लक्षात घेणे आवश्यक आहे. अनेक निधींमध्ये गुंतवलेली रक्कम दीर्घकाळासाठी अडकून राहू शकते. व्यवस्थापन शुल्क, बाजारातील चढ-उतार आणि गुंतवणुकीचे स्वरूप यांचाही परताव्यावर परिणाम होतो. त्यामुळे केवळ अधिक नफ्याच्या अपेक्षेने गुंतवणूक न करता निधीची पार्श्वभूमी, पैसे काढण्याच्या अटी आणि संभाव्य तोटा सहन करण्याची क्षमता तपासणे महत्त्वाचे आहे. योग्य अभ्यास आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पर्यायी गुंतवणूक निधी हा गुंतवणुकीत विविधता आणण्यासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतो.
