घरबिजनेससणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दराचा भडका

सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दराचा भडका

स्वयंपाकघराचे बजेट कोलमडणार!

सणासुदीचा हंगाम सुरू असतानाच खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडवले आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता खाद्यतेलाच्या दरवाढीचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. फराळ, मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांच्या तयारीसाठी सणासुदीच्या काळात तेलाची मागणी वाढते. मात्र, याच काळात तेलाच्या किमती वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरगुती ग्राहकांबरोबरच हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ उत्पादकांनाही या दरवाढीचा फटका बसत आहे.

खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात आयात शुल्कात कपात केली होती. कच्च्या पामतेल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले, तर कच्च्या सूर्यफूल तेलावरील शुल्क शून्यावर आणण्यात आले. रिफाइंड तेलावरील आयात शुल्कातही कपात करण्यात आली. या निर्णयामुळे आयात खर्च कमी होऊन ग्राहकांना स्वस्त दरात तेल उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतींमुळे या निर्णयाचा अपेक्षित फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नाही. गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये १५ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा:
दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

अमेरिकन शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’!

लंडनमध्ये असल्याचे भासवून तरुणीचे पुण्यात वास्तव्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू टँकरवर माइन हल्ला

सध्या शेंगदाणा तेलाचा दर प्रतिकिलो २३१ रुपये, मोहरीचे तेल २२२ रुपये, सूर्यफूल तेल २१४ रुपये, वनस्पती तेल १८४ रुपये, सोयाबीन तेल १८० रुपये, तर पामतेलाचा दर १६५ रुपये इतका असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अनेक खाद्यतेलांचे दर प्रतिकिलो २०० रुपयांच्या पुढे गेल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सणासुदीच्या काळात तेलाची मागणी वाढत असल्याने आगामी काळात दरवाढीचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.

भारत आपल्या खाद्यतेलाच्या एकूण गरजेपैकी जवळपास दोन तृतीयांश तेल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, पुरवठ्यातील चढ-उतार आणि रुपयाचे घसरते मूल्य यांचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर होतो. यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत खाद्यतेल आयातीसाठी भारताला सुमारे ८७ हजार कोटी रुपये खर्च करावे लागले, तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा खर्च ७३ हजार कोटी रुपये होता. आयात खर्चातील ही वाढ आणि जागतिक बाजारातील महागाई यामुळे खाद्यतेलाचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीचा आनंद साजरा करताना सर्वसामान्यांना महागाईचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version