भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशाच्या परकीय चलनसाठ्याने आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर गाठला असून, ४ सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह तब्बल ४४.९० अब्ज डॉलरने वाढून ७८५.७१ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. याआधी २८ ऑगस्टला देशाचा परकीय चलनसाठा ७४०.८० अब्ज डॉलर होता. अवघ्या एका आठवड्यात झालेली ही प्रचंड वाढ भारतीय अर्थव्यवस्थेची बाह्य स्थिती मजबूत असल्याचे संकेत देणारी मानली जात आहे. विशेष म्हणजे, परकीय चलनसाठ्यात सलग दहाव्या आठवड्यात वाढ नोंदवण्यात आली आहे.
या विक्रमी वाढीमध्ये फॉरेन करन्सी अॅसेट्स म्हणजेच परकीय चलन मालमत्तेचा सर्वात मोठा वाटा आहे. या मालमत्तेत एका आठवड्यात सुमारे ४७.५० अब्ज डॉलरची वाढ झाली असून ती ६४८.१७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. देशात वाढलेला परकीय भांडवली प्रवाह, परदेशातून येणाऱ्या निधीत झालेली वाढ आणि डॉलरच्या प्रवाहातील सुधारणा यामुळे परकीय चलनसाठ्याला मोठी चालना मिळाल्याचे दिसते. भारताकडे मोठ्या प्रमाणात डॉलरचा साठा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरची मागणी किंवा रुपयावर वाढणारा दबाव यांचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अधिक मजबूत पर्याय उपलब्ध होतात.
हे ही वाचा:
‘ब्रिक्स’मध्ये प्रवेशासाठी पाकिस्तानची तीन वर्षांपासून धडपड
सहा वर्षांनंतर ग्वांगझोऊ-नवी दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार
मोदींचा ब्रिक्समधील ‘तो’ फोटो सांगतोय भारताची कूटनीती!
माजी लष्करी हवालदाराने चोरल्या चार AK-203 रायफल्ससह १,९०० काडतुसे
दरम्यान, परकीय चलनसाठ्यातील या मोठ्या वाढीच्या काळात भारताच्या सोन्याच्या साठ्यात मात्र घट झाली आहे. आठवडाभरात सोन्याच्या साठ्याचे मूल्य सुमारे २.५९ अब्ज डॉलरने कमी होऊन ११३.८२ अब्ज डॉलरवर आले. मात्र, दीर्घकालीन चित्र पाहिल्यास सोन्याच्या साठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. मार्चअखेरच्या तुलनेत भारताच्या एकूण परकीय चलनसाठ्यात जवळपास ९४.६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, तर मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ सुमारे ८७.४ अब्ज डॉलर आहे. त्यामुळे भारताचा बाह्य आर्थिक पाया अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट होते.
विक्रमी फॉरेक्स रिझर्व्हमुळे आयात देयके भागवणे, जागतिक आर्थिक संकटाचा सामना करणे आणि रुपयातील मोठ्या चढ-उतारांना आळा घालण्यासाठी आरबीआयला अधिक मोठे आर्थिक कवच मिळाले आहे. परिणामी, भारताची परकीय क्षेत्रातील स्थिरता आणि गुंतवणूकदारांचा विश्वास यांना आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.
