स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच एसबीआयच्या सॅलरी अकाउंटधारकांसाठी महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. १ ऑक्टोबर २०२६पासून एसबीआयच्या सॅलरी पॅकेज अकाउंटवर दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या मोफत व्यवहारांची मर्यादा निम्मी होणार आहे. सध्या सॅलरी अकाउंटधारकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएम किंवा एडीब्ल्यूएममधून महिन्याला १० मोफत व्यवहार करता येतात. मात्र, १ ऑक्टोबरपासून ही मर्यादा केवळ ५ व्यवहारांवर येणार आहे. विशेष म्हणजे या पाच व्यवहारांमध्ये आर्थिक व्यवहारांसोबतच नॉन-फायनान्शियल व्यवहारांचाही समावेश असेल.
ही मोफत मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून प्रत्येक अतिरिक्त कॅश विड्रॉलसाठी २३ रुपये अधिक जीएसटी, तर नॉन-फायनान्शियल व्यवहारासाठी ११ रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल. मात्र, या शुल्काच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही; मुख्य बदल हा मोफत व्यवहारांची संख्या १० वरून ५ करण्याचा आहे.
हे ही वाचा:
कोलकात्यात हॉटेलांच्या किचनमध्ये सडलेले मांस, मिठाईत गुलाल
पेपालने भारतातून ६०० कर्मचाऱ्याना केलं कमी
डीजेविरोधी भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला
यासिन मलिकचे सरला भट हत्या प्रकरणाला आव्हान नाही!
महत्त्वाचं म्हणजे हा बदल फक्त एसबीआयच्या सॅलरी पॅकेज अकाउंटधारकांसाठी आणि दुसऱ्या बँकांच्या एटीएमवरील व्यवहारांसाठी आहे. एसबीआयच्या स्वतःच्या एटीएमचा वापर करणाऱ्या सॅलरी पॅकेज ग्राहकांना मात्र अमर्यादित मोफत व्यवहाराची सुविधा कायम राहणार आहे. तसेच सॅलरी पॅकेजशिवाय इतर एसबीआय अकाउंटधारकांच्या मोफत एटीएम व्यवहारांच्या नियमांमध्ये या निर्णयामुळे बदल होणार नाही. त्यामुळे सॅलरी अकाउंट असणाऱ्या ग्राहकांनी दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर करताना आता महिन्याला फक्त पाच मोफत व्यवहारांची मर्यादा लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
