घरबिजनेसकाल ‘मृत’ अर्थव्यवस्था, आज भारत अमेरिकेसाठी आदर्श!

काल ‘मृत’ अर्थव्यवस्था, आज भारत अमेरिकेसाठी आदर्श!

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत ट्रम्प यांचा सूर बदलला

जुलै २०२५ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत’ म्हणत टीका करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्याच भारताचे कौतुक करताना दिसत आहेत. भारताचा ७ टक्क्यांचा विकासदर आणि तुलनेने कमी व्याजदरांचा दाखला देत त्यांनी अमेरिकेच्या आर्थिक धोरणांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. काही महिन्यांपूर्वी भारताच्या रशियाकडून तेलखरेदीवरून व्यापार निर्बंधांचा इशारा देणारे ट्रम्प आता अमेरिकेच्या प्रगतीसाठी भारताचे उदाहरण देत आहेत. ट्रम्प यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची विकासवाढ हा चर्चेचा विषय ठरत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आर्थिक विकासाचे कौतुक करत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची तुलना भारताशी केली आहे. भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) विकासदर सुमारे ७ टक्के असून देशातील व्याजदरही तुलनेने कमी आहेत. याचा दाखला देत अमेरिकेनेही व्याजदर कमी केल्यास देशाचा आर्थिक विकासदर १४ ते १५ टक्के, किंबहुना २० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केला. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. भारताच्या आर्थिक कामगिरीचे कौतुक करण्याबरोबरच अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या म्हणजेच फेडरल रिझर्व्हच्या आर्थिक धोरणांवर त्यांनी जोरदार टीका केली.

ट्रम्प म्हणाले, “भारताकडे पाहा. तिथे व्याजदर कमी आहेत आणि आर्थिक विकासदर ७ टक्के आहे. अमेरिकेतही व्याजदर कमी असते, तर आपला विकासदर १४, १५ किंवा कदाचित २० टक्के असता.” अमेरिकेसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेची क्षमता असूनही फेडरल रिझर्व्हच्या धोरणांमुळे अपेक्षित आर्थिक वाढ साधता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

अमेरिकेतील व्याजदर जास्त ठेवण्यामागे फेडरल रिझर्व्हची राजकीय भूमिका असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. चांगले आर्थिक आकडे समोर आल्यानंतर व्याजदर कमी करण्याऐवजी फेडरल रिझर्व्ह ते वाढवते, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेची कामगिरी सुधारत असेल, तर कर्ज घेण्याची क्षमता आणि पतमानांकनही सुधारते. अशा वेळी व्याजदर कमी करून उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यायला हवे. मात्र, अमेरिकेत याच्या उलट घडत असल्याची टीका त्यांनी केली.

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या माजी फेडरल रिझर्व्ह अध्यक्ष अॅलन ग्रीनस्पॅन यांच्या कार्यपद्धतीचेही कौतुक केले. चांगले आर्थिक आकडे समोर आल्यानंतर ग्रीनस्पॅन व्याजदर कमी करण्याचा विचार करत असत, असे त्यांनी सांगितले. अमेरिकेने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे अमेरिकेत जगातील सर्वात कमी व्याजदर असायला हवेत, असेही ट्रम्प म्हणाले.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये विषारी दारूने घेतला १५ जणांचा बळी

भारतात जन्मलेल्या दहशतवाद्यांपासून जम्मू-काश्मीर ३५ वर्षांनी मुक्त!

अय्यप्पा दीक्षा घेतलेल्या हिंदू कर्मचाऱ्याला टीसीएस कार्यालयात प्रवेश नाकारला

नवी मुंबई विमानतळावर विमानांची विक्रमी वाहतूक

भारताचा आर्थिक विकासदर जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) ऑक्टोबरमध्ये भारताच्या २०२६ मधील आर्थिक विकासाचा अंदाज ७ टक्क्यांपर्यंत वाढवला होता. दुसरीकडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑक्टोबरमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करून तो ५.५० टक्क्यांवर नेला होता. महागाईचा दबाव आणि जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक व्याजदरांबाबत निर्णय घेत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version