मुंबईतील माझगाव परिसरात रविवारी (२३ ऑगस्ट) गणपती आगमन सोहळ्यादरम्यान अंडी फेकण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला. ‘माझगावचा मोरया’ गणपती बाप्पाच्या आगमनावेळी अंडी फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त गणेश मंडळाचे कार्यकर्ते, तरुण आणि गणेशभक्तांनी रात्री आंदोलन करत निषेध व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे माझगाव परिसरात दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटे ३ वाजेपर्यंत परिसरात तणावाची स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे.
गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान कॉन्टिनेंटल हाइट्स इमारतीतून अंडी फेकण्यात आल्याचा संशय गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्तांनी व्यक्त केला आहे. मात्र, अंडी नेमकी कुठून आणि कोणी फेकली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, अंडी प्रत्यक्षात कोणत्या इमारतीतून फेकण्यात आली आणि त्यामागे कोण होते, याचा शोध घेतला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अद्याप अंडी फेकल्याच्या आरोपावरून कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
नेमकं काय घडलं?
‘माझगावचा मोरया’ गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यादरम्यान अंडी फेकल्याची घटना घडली. या घटनेनंतर गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त संतप्त झाले. त्यांनी रात्रीच्या वेळी आंदोलन करत या घटनेचा निषेध केला. घटना घडलेल्या परिसरात तीन ते चार मोठ्या इमारती असल्याने अंडी नेमक्या कोणत्या इमारतीतून फेकण्यात आली, हे निश्चित करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्तांनी एका विशिष्ट इमारतीवर संशय व्यक्त केला आहे. मात्र, पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या तपास पथकाकडून परिसरातील इमारतींमध्ये चौकशी केली जात आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. अंडी नेमकी कुठून फेकण्यात आली, त्या वेळी संबंधित इमारतीत कोण उपस्थित होते आणि या घटनेमागे नेमके कोण होते, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २९६ आणि १९६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिरवणुकीचा मार्ग आणि संबंधित इमारतीच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलीस संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावरील व्हिडिओंवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हे ही वाचा:
जागतिक बाजाराचा सकारात्मक डोस; आयटीच्या जोरावर शेअर बाजारात तेजी
रुग्णालयातील नवजात शिशू विभागाला आग; तीन बाळांचा मृत्यू
पाकच्या हवाई तळांवर तुर्कीच्या लष्करी विमानांची वारंवार ये-जा?
जयपूरमध्ये पाद्रीवर ईडीची छापेमारी; धार्मिक परिवर्तनासाठी निधी वापरला
१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात
यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मुंबईत सुमारे १० हजार ६०० सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० मंडळांनी दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी परवानगी घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात यंदा सुमारे २८ लाख गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होण्याचा अंदाज आहे.
